वारे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे

0
144

दिल्लीचे वार्तापत्र
••आज रालोआजवळ ५ लाख ३१ हजार ४४२ मते आहेत. म्हणजे भाजपाला फक्त १८ हजार मतांची गरज आहे. तेलंगणा राष्ट्र समितीजवळ अंदाजे २३ हजार मते तर वायएसआर कॉंग्रेसजवळ १६ हजार मते आहेत. या दोघांनीही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यामुळे भाजपाजवळ ५ लाख ७० हजार ४४२ मते झाली आहेत.
••राजधानी दिल्लीत सध्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे स्वाभाविकच राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार आणि देशातील सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार मतदान करत असतात. त्यामुळे सत्ताधारी आघाडी आणि विरोधी आघाडी आतापासूनच कामाला लागली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटकपक्षांची बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यात या निवडणुकीच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या मुद्यावरून राजकारण संन्यास घेण्याची तयारी करणार्‍या कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी सुरू केल्या आहेत.
मंगळवारी सीबीआय आणि आयकर खाते माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम् आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी छापे घालत असताना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून भाजपाला घेरण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आपले जुने वैर विसरून कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी १० जनपथला गेल्या होत्या. या वेळी या दोघींमध्ये अर्धा तास चर्चा झाली.
पंजाब वगळता आतापर्यंत देशातील सर्व राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा दारुण पराभव झाला असताना कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचा पराभव करण्याचे दिवास्वप्न दिवसाढवळ्या पाहात आहे. उत्तरप्रदेश आणि अन्य पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाजवळ जवळपास दीड लाख मते कमी होती.
त्यामुळेच उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यातील निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रपतिपदाची स्वप्ने पडत होती. मात्र उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यांत भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर जवळपास सव्वा लाख मतांची तूट भरून निघाली. त्यामुळेच शरद पवार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसला करावा लागला. आता भाजपाला राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी साधारणत: १८ हजार मतांचीच गरज आहे.
ज्या वेळी भाजपाला दीड लाख मतांची गरज होती, तोपर्यंत टीआरएस आणि वायएसआर कॉंग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आता या दोघांनीही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत स्वबळावर आपला उमेदवार निवडून आणणे भाजपा आणि पर्यायाने राष्ट्रीय लोकसभा आघाडीला सहजशक्य आहे. विरोधकांची मनधरणी करण्याची भाजपाला गरज नाही.
विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी राष्ट्रपतिपदाच्या आपल्या उमेदवाराच्या नावाची आतापर्यंत घोषणा केली नाही. दोन्ही बाजू एकदुसर्‍याचा उमेदवार घोषित होण्याची वाट पाहत आहे. भाजपातर्फे लोकसभेच्या अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्यासह आणखी काही नावांची प्रामुख्याने चर्चा आहे. मध्यंतरी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे नावही चर्चेत होते.
कॉंग्रेस आणि अन्य विरोधी आघाडीतर्फे गोपालकृष्ण गांधी, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र या निवडणुकीत भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी कॉंग्रेस आणि अन्य सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेेते नितीशकुमार यांनी या मुद्यावर प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे.
मात्र, सर्वसहमतीच्या उमेदवारीचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाकडून येत असेल तरच आपण यावर विचार करू, असे सांगत प्रणव मुखर्जी यांनी नितीशकुमार यांचा प्रस्ताव पद्धतशीर उडवून लावला. सत्ताधारी पक्ष प्रणव मुखर्जी यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपतिपदाची संधी देण्याची शक्यता सध्या तरी अतिशय कमी आहे. भाजपा आणि रालोआजवळ पुरेसे संख्याबळ असताना या निवडणुकीत सर्वसहमतीचा उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता कमी आहे.
देशात लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण ७७६ खासदार आहेत. यात लोकसभेच्या ५४३ आणि राज्यसभेच्या २३३ खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेच्या नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. देशातील सर्व राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांची संख्या ४१२० आहे. म्हणजे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे एकूण मतदार ४८९६ आहेत. मात्र या मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १० लाख ९८ हजार ८८२ आहे. विशेष म्हणजे यात प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ तर आमदाराच्या मताचे मूल्य राज्यनिहाय कमीजास्त असते.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ५ लाख ४९ हजार ४४२ मतांची रालोआला गरज आहे. आज रालोआजवळ ५ लाख ३१ हजार ४४२ मते आहेत. म्हणजे भाजपाला फक्त १८ हजार मतांची गरज आहे. तेलंगणा राष्ट्र समितीजवळ अंदाजे २३ हजार मते तर वायएसआर कॉंग्रेसजवळ १६ हजार मते आहेत. या दोघांनीही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यामुळे भाजपाजवळ ५ लाख ७० हजार ४४२ मते झाली आहेत.
कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआजवळ १ लाख ७३ हजार ८४९ मते आहेत. भाजपेतर आणि कॉंग्रेसेतर आघाडीजवळ २ लाख ४४ हजार ३९२ मते आहेत. अन्य पक्षांचे संख्याबळ १ लाख १० हजार ९०७ आहे. भाजपाविरोधी सर्व पक्षांच्या मतांची बेरीज केली तरी ती ५ लाख २९ हजार १४८ होते. म्हणजे याही स्थितीत भाजपाजवळ ४१ हजार मते जास्त आहेत. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार जिंकण्याच्या मार्गात कोणताही अडथळा राहत नाही.
रालोआच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली असली तरी शिवसेनेचा आतापर्यंतच्या दोन निवडणुकीतील इतिहास खूप काही चांगला नाही. २००७ मध्ये झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मराठीच्या मुद्यावर कॉंग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना मतदान केले होते. या वेळी रालोआने माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिवसेना या निवडणुकीत इजाबिजा आणि तिजा करणार नाही, याची काळजी भाजपाला घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रपतिपदाचा भाजपाचा उमेदवार कोण हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच माहीत आहे. रालोआतील सर्व पक्षांना विश्‍वासात घेऊनच भाजपा आपल्या उमेदवाराची घोषणा करेल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. भाजपाने आपल्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतरच कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष राष्ट्रपतिपदाच्या आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करत या निवडणुकीतील चुरस वाढवतील, पण कोणत्याही स्थितीत ते भाजपाच्या उमेदवाराला विजयापासून रोखू शकणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७