सेन्सेक्स, निफ्टीची नव्या विक्रमाला गवसणी

0
65

मुंबई, १७ मे
भारतीय शेअर बाजारात तेजीचा जोर अजूनही ओसरलेला नाही. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज (बुधवार) ३०,६९२.४५ अंशांची नवीन उच्चांकी पातळी गाठली. अखेर ७६ अंशांनी वधारून ३०६५८.७७ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ९,५३२.६० अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. निफ्टी १३ अंशांनी वधारून ९५२५.७५ पातळीवर बंद झाला आहे.
शेअर बाजारात निफ्टी आणि सेन्सेक्स या मुख्य निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा मारा सुरू होता. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, मेटल आणि कॅपिटल गुड्स कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. त्यामुळे निर्देशांकाला बळ मिळाले. निफ्टीचा ऑटो निर्देशांक ०.७ टक्के आणि मेटल निर्देशांक २.२५ टक्के आणि बीएसईचा निर्देशांक कॅॅपिटल गुड्स निर्देशांक ०.२५ टक्के वाढीसह बंद झाला. याउलट एफएमसीजी, आयटी, फार्मा, पीएसयू बँक, कंज्यूमर ड्युरेबल्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आज मुंबई शेअर बाजारात टाटा स्टील, भारती इन्फ्राटेल, इंडियाबुल्स हौसिंग, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि एशियन पेंट्स यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. तर टेक महिंद्रा, एसीसी, बॉश, येस बँक, अदानी पोर्ट्स, विप्रो, एचडीएफसी, सिप्ला, आयटीसीचे शेअर्स सर्वाधिक घसरणीसह बंद झाले आहे. (वृत्तसंस्था)