औरंगाबादच्या विपुलने गाजविले क्रोएशिया

0
100

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी
औरंगाबाद, १७ मे
राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अंतर्गत राजकारणामुळे औरंगाबादचा गुणवंत बास्केटबॉलपटू विपुल कडने महाराष्ट्र सोडून दुसर्‍या राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय धाडसी मात्र योग्य ठरला. छत्तीसगडकडून खेळताना भारतीय बास्केटबॉल संघात प्रवेश मिळवताना विपुल कड याने नुकत्याच क्रोएशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने ज्या खेळाडूच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले, ती गुणवत्ता हेरून छत्तीसगड संघटनेने विपुलला संधी दिली. त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने करताना भारतीय संघाकडून खेळण्याचा मान मिळवला.
मागच्या वर्षी मुंबईच्या वाशी येथे राज्य बास्केटबॉल स्पर्धा झाली. यात औरंगाबादने उत्तम कामगिरी करून तिसरे स्थान पटकावले. औरंगाबादकडून विपुलने संपूर्ण स्पर्धेत चमकदार प्रदर्शन केले. मात्र, गुणवत्ता, उत्तम कामगिरी व फॉर्म असूनही त्याला राज्य संघात वगळले. वैतागलेल्या विपुलने दुसर्‍या राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. वडील गणेश आणि आई मंदा यांनी विपुलच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्याने हा विश्‍वास सार्थकी ठरवला. तो मराठवाड्याचा पहिला आंतराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ठरला . १५ व्या वर्षीच सहा फूट दोन इंच उंचीमुळे विपुलला खेळात फायदा होत आहे. चपळता व डंकिंगमध्ये त्याचा हातखंडा असून हेच त्याचे खेळातील अस्त्र आहे. त्याच जोरावर त्याने दोन राज्यस्तरीय स्पर्धा आणि एक कार्फबॉलची राष्ट्रीय स्पर्धा गाजवली आहे.
आहार, उंची व खेळाडूंचा समन्वय या तीन गोष्टींमध्ये भारतीय कमी पडतात. क्रोएशियात आम्ही फिनलंड, हंगेरी, इंग्लंड, क्रोएशिया, सर्बिया, चायनीज तैपेई व तुर्की या देशांच्या संघांविरुद्ध खेळलो,असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)