सुनीता लकडाचे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे शतक

0
101

प्यूककोहे, १७ मे
भारताच्या राष्ट्रीय महिला हॉकी चमूची खेळाडू सुनीता लकडा हिने आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडमध्ये खेळला. सध्या भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळत आहे. यातील तिसरा सामना बुधवारी पार पडला. सुनीताचा हा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ३-२ असा पराभव केला. २००९ मध्ये सुनिताने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. ती भारतीय हॉकी संघातील महत्त्वाची खेळाडू आहे. न्यूझीलंड येथे सध्या सुरू असलेल्या मालिकेत ती भारतीय संघाच्या संरक्षण फळीचे नेतृत्व करीत आहे. यात दीप ग्रेस एक्का, नमिता टोप्पो, सुशीला चानू, उदिता आणि गुरजीत कौर यांचा समावेश आहे.
ओडिशात जन्मलेल्या सुनीताने १७ व्या आशियाई स्पर्धा व २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे. याशिवाय तिने महिलांच्या एशियन चॅम्पियन ट्रॉफी टुर्नामेंटच्या चौथ्या हंगामात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. (वृत्तसंस्था)