न्यूझीलंडची भारतावर मात

0
120

महिला हॉकी
प्यूककोहे, १७ मे
पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील तिसर्‍या सामन्यात भारतीय महिला संघाला आज न्यूझीलंडकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. मात्र हा सामना अतिशय चित्तथरारक व संघर्षपूर्ण ठरला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडची चमू ३-० ने पुढे आहे. यापूर्वीच्या सामन्यात २-८ असे पराभूत झाल्यानंतर आज मात्र भारतीय संघाने उत्तम कामगिरी बजावली. फॉरवर्ड फळीतील खेळाडूंनी आक्रमक खेळ सादर केला व त्यांचा समन्वयही आधीच्या सामन्यापेक्षा चांगला होता. प्रारंभापासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ सादर केला. त्यामुळे पहिल्या सत्रात भारताने १-० अशी आघाडी मिळविली.
दीप ग्रेस इक्काने नवव्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडच्या एला गुंसोनने १३ व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला बरोबरी प्राप्त करून दिली. पहिल्या क्वॉर्टरमधील १५ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या डायना रिचीने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती. कर्णधार स्टासे मिशेलसेनने दिलेल्या सुंदर पासवर डायनाने हा गोल नोंदविला.
भारतीय संघाला दुसर्‍या क्वॉर्टरमध्ये गोल करण्याची दोनदा संधी मिळाली. तसेच २६ व्या मिनिटाला संघाला सलग दोन पेनॉल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, भारताला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. भारताची कर्णधार राणीने हाणलेला जोरदार फटका न्यूझीलंडच्या संरक्षण फळीतील खेळाडूंनी अडविला. न्यूझीलंडकडून तिसरा गोल शिलोह ग्लोईनने ३९ व्या मिनिटाला केला. तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये सविताने अनेक गोल वाचविले. ५९ व्या मिनिटाला राणीच्या पासवर मोनिकाने दुसरा गोल केला. आता उभय संघामधील चौथा सामना १९ मे रोजी खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)