शाही इमाम बरकती यांची हकालपट्टी

0
103

पंतप्रधानांना आव्हान देणे अंगलट
कोलकाता, १७ मे 
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फतवा काढणारे टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुर-उर रहमान बरकती यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. देशविरोधी विधान केल्याने मुस्लिम समाजाचे नुकसान झाल्याने बरकतींना शाही इमामपदावर राहता येणार नसल्याने विश्‍वत मंडळाने त्यांची हकालपट्टी केली.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी वाहनांवरील लाल दिव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता. देशातून या निर्णयाला प्रतिसाद मिळत असतानाच पश्‍चिम बंगालमधील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरूर रहमान बरकती यांनी आव्हान दिले होते. माझ्या गाडीवरील लाल दिवा मोदीही हटवू शकणार नाही, असे आव्हान देत त्यांनी चक्क पंतप्रधानांविरोधात फतवा काढला होता. त्यामुळे विश्‍वस्त मंडळाने बरकती यांना शाही इमाम पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, बरकती अनेक वर्षांपासून टिपू सुलतान मशिदीच्या शाही इमामपदी होते. तसेच, ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याने ते काही दिवसांपासून चर्चेत होते.
या वादग्रस्त विधानांमुळे बरकती यांना ममता बॅनर्जींचाही पाठिंबा मिळू शकला नाही, अशी चर्चा आहे. (वृत्तसंस्था)