तानसा अभयारण्यात दुर्मिळ गिधाड

0
103

बिबटे मात्र गायब
शहापूर, १७ मे
तानसा अभयारण्यात १० मे रोजी पशुपक्ष्यांची गणना करण्यात आली होती. यावेळी तब्बल ३६१ प्राणी व पक्ष्यांची मोजदाद केली गेली. त्यामध्ये दुर्मिळ अशा गिधाडांची नोंद झाली आहे. या जंगलातून मात्र बिबटे गायब झाले असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
तानसा अभयारण्यातील नदी पात्रातील तब्बल ४० पाणवठ्यांवर वन अधिकारी, कर्मचारी, प्राणी व पक्षी मित्र, स्थानिक गावकरी यांच्या मदतीने १० मे रोजी मचाण व लपण्याच्या जागा करून या पाणवठ्यावर येणार्‍या पक्षी व प्राण्यांच्या पायांचे ठसे घेतल्यानंतर त्यावर दोन दिवस अभ्यास करून ही गणना करण्यात आली. या गणनेत दुर्मिळ जातीच्या सहा गिधाडांची नोंद झाली आहे. मात्र, या परिसरात एकही बिबट्या नजरेस पडला नाही.
या विषयी वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक डी. एल. मते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, केवळ या नदी पात्रातील पक्षी व प्राणी गणना केली म्हणजे ती सर्वच प्राणी व पक्षी यांची गणना झाली असे होत नसून, असे शेकडो पाणवठे आहेत की, ज्याची पाहणी केल्यानंतर खरी संख्या पुढे येईल. त्यामुळे या जंगलात बिबटे नाहीत असे म्हणता येणार नाही. मात्र या पाहणीत ते दिसून आले नाहीत, हे खरे आहे. (वृत्तसंस्था)