रेवाडीत मिळणार बारावीपर्यंतचे शिक्षण

0
82

– विद्यार्थिनींची मागणी पूर्ण, उपोषण मागे
– मनोहरलाल खट्टर सरकारचा निर्णय
रेवाडी, १७ मे
हरयाणाच्या रेवाडी येथील शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थिनींकडून गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची आज बुधवारी यशस्वी सांगता झाली. मनोहरलाल खट्टर सरकारने या मुलींची मागणी मान्य करताना, त्या शिकत असलेल्या शाळेतच बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करणारी अधिसूचना जारी केली. यानंतर विद्यार्थिनींनी आपले उपोषण मागे घेतले.
८० पेक्षा जास्त विद्यार्थिनी या मागणीसाठी सहा दिवसांपासून उपोषणावर होत्या. तर यातील १३ मुलींनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
काही मुलींची प्रकृती खालावली होती. तीन मुलींना रुग्णालयातही भरती करण्यात आले. पण, उपोषण मागे घेण्यास त्या तयार नव्हत्या. अखेर खट्टर सरकारने आज त्यांच्यापुढे नमते घेतले आणि त्यांची मागणी मान्य केली. त्यानंतर लगेच रेवाडीतील शाळेत १२ वी पर्यंतचे शिक्षण देणारी अधिसूचना जारी करण्यात आली.
या गावातील शाळेत केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतरावरील कनवली या गावात जावे लागते.
या प्रवासात गुंड प्रवृत्तीचे लोक मुलींची छेड काढण्याचे प्रकारही भरपूर घडले आहेत. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी गावातील मुलींनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता आणि आज त्याला यश आले. (वृत्तसंस्था)