भुजबळांच्या बडदास्तीची चौकशी होणार

0
108

मुंबई, १७ मे
ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेले छगन भुजबळ यांची खास बडदास्त ठेवण्यात येत असल्याच्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपावरून राज्याच्या तुरुंग विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दमानिया यांनी याबाबत तुरुंग विभागाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांना पत्र पाठविले होते.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात खास व्यवस्था करण्यात आली आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.
दरम्यान, दमानिया यांची तक्रार पुढील कार्यवाहीसाठी तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती महानिरीक्षक उपाध्याय यांनी दिली.
असे आहेत आरोप
– ५ फूट टीव्हीची व्यवस्था, त्यावर भुजबळ कार्यक्रम पाहतात.
– जेवणासाठी चिकन मसाला, दर दोन तासांनी फळे मिळतात.
– समीर भुजबळांसाठी तुरुंगातच दारू पोहोचविली जाते.
– नारळपाण्याच्या नावाखाली तुरुंगात व्होडका पोहोचतो.
– समीर यांच्यासाठी मोबाइल जॅमरमध्ये छेडछाड केली आहे.
आरोप खोटे, भुजबळांचे तुरुंगातून पत्र
मुंबई : अंजली दमानियांनी केलेले आरोप किती खोटे आहेत, हे तुरुंगातील सीसीटीव्ही पाहून कुणालाही तपासता येईल. त्यामुळे आपण दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत, असा इशारा छगन भुजबळांनी एका पत्रातून दिला आहे.
सदर पत्रात भुजबळांनी म्हटले आहे की, आम्हाला जामीन मिळू नये, यासाठी ठराविक काळाने खोट्या बातम्या पसरवल्या जातात. प्रत्येक सर्कलमध्ये एक सामुदायिक टीव्ही असून, केवळ दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहता येतात. घरचे जेवण देण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, फळे दिली जातात, हे खोटे आहे. तुरुंगात कुणीही नारळ आणू शकत नाही. आमच्या परिसरात शेकडो सीसीटीव्ही लावले असून, ते सतत मॉनिटर केले जातात. बरॅकमध्ये जॅमर लावले आहेत, तर मोबाईल येणार कुठून, असा प्रश्‍नही त्यांनी केला आहे. दरम्यान, भुजबळांच्या या पत्रानंतर अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीकडे दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, अशा कारवाईंची मला सवय झाली आहे. भुजबळ साहेब, तुम्ही मला तडकवू नका. (वृत्तसंस्था)