शहर कॉंग्रेसमध्ये पुन्हा दुफळी

0
99

नागपूर, १७ मे
महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्य आणि गटनेत्याच्या निवडीवरून शहर कॉंग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. आतापर्यंत माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक तानाजी वनवे यांनी अचानक बंडाचा झेंडा उभारला. त्यांना असंतुष्ट नगरसेवकांनी साथ दिल्याने शहर कॉंग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे.
शहर कॉंग्रेसचा वाद प्रदेशाध्यक्षच नव्हे, तर कॉंग्रेस अध्यक्षांपर्यंत गेला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत शहर कॉंग्रेसचे काही नेते जाऊन आले. परंतु, हा वाद सोडविण्यास श्रेष्ठीही अपयशी ठरले. शहर कॉंग्रेसच्या वादाचा लाभ भाजपाला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत शहर कॉंग्रेसमुक्त झाल्यानंतरही हा वाद संपण्याची चिन्हे नाही. या वादामुळे महानगरपालिका निवडणुकीतही कॉंग्रेस नेत्यांनी पाडापाडीचे राजकारण केले. परिणामी कॉंग्रेसला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यातुलनेत भाजपाला तब्बल १०८ जागा मिळाल्या.
महानगरपालिका निवडणुकीतील पराभवावर नेत्यांनी कवित्व केले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. पक्षविरोधी कारवाया केल्याचे सांगून काही नेत्यांची हकालपट्टी करण्याबाबतचा अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आला. परंतु, पुढे काहीच झाले नाही. त्यानंतर पराभवाची कारणमीमांसा करण्याऐवजी पुन्हा कॉंग्रेसमध्ये गटनेता निवडीचा वाद सुरू झाला. वरिष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना डावलून संजय महाकाळकर यांना विरोधी पक्षनेता बनविण्यात आले. परंतु, महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेता असल्याचे जाणवले नाही. अर्थात विरोधी पक्षनेत्याचा आवाज विरल्याचेच दिसून आले. भाजपाने नामनिर्देशित सदस्यांची नावे घोषित केल्यानंतर कॉंग्रेसमधून शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे नाव जवळजवळ निश्‍चित झाले होते. परंतु, आता ठाकरेंच्या नावाला विरोध होत आहे. तानाजी वनवे हे विलास मुत्तेमवार यांचे समर्थक मानले जातात. असंतुष्ट नगरसेवकांनी त्यांना हाताशी धरून गटनेता बनविण्याची ऑफर दिली आणि त्यास ते बळी पडले. त्यांच्या नावाला १८ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. नामनिर्देशित सदस्यांची निवड गटनेता करीत असतो. त्यामुळे ठाकरे यांची नामनिर्देशित सदस्यपदी निवड होऊ नये म्हणून हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते. कॉंग्रेसमधील हा वाद आगामी लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचे संभावित उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्यासाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.