भाजपा दक्षिण-पश्‍चिमतर्फे सोनेगाव तलाव स्वच्छता अभियान

0
120

– नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम
नागपूर, १७ मे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या येत्या २७ मे रोजी होणार्‍या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या दक्षिण पश्‍चिम मंडळातर्फे अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, यंदा सोनेगाव तलाव स्वच्छता अभियान या उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आल्याची माहिती मनपाचे सत्तापक्षनेते आणि भाजपाचे शहर महामंत्री संदीप जोशी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
गेल्यावर्षी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील सोनेगाव तलावाच्या स्वच्छतेचे अभियान यानिमित्ताने हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत तलावाचे खोलीकरण, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करणे, बडिंग डेव्हलपमेंट, वृक्षारोपण आदी कामे केली जातील, असेही जोशी यांनी सांगितले.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांशी भाजपाचे पदाधिकारी संपर्क साधत असून, रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबतही लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या अभियानात सोनेगाव तलावातून सुमारे पाच हजार ट्रक गाळ काढण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. २१ ते २८ मे दरम्यान हे काम चालणार आहे. ऑरेंज सिटी स्ट्रीटमधील भागात मोठमोठे खड्डे असून, ते सुद्धा बुजविले जाणार आहे. शिवाय हिंगण्याजवळील एका गावातील शेतकर्‍याने दहा ट्रक गाळाची मागणी केली आहे. त्यांना तो नि:शुल्क उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती देऊन संदीप जोशी म्हणाले, ज्यांना हा गाळ पाहिजे असेल त्यांना तो उपलब्ध करून दिला जाईल. घरातील बगिच्यांसाठी हा गाळ उपयुक्त असल्यामुळे अशा लोकांनीही पुढे येऊन तो घेऊन जावा, असे आम्ही त्यांना आवाहन करतो. या कामासाठी सात पोकलेन, पाच-सहा जेसीबी आणि ३० ते ४० टिप्पर वापरले जाणार आहेत.
काही वर्षांपासून हा तलाव उन्हाळ्यात सातत्याने कोरडा पडतो. त्याला काही कारणेही आहेत. त्याचा शोध घेतला जाईल. तलावाच्या अडीच टक्के भागात कपांऊंड वॉल टाकण्यात आली आहे, उर्वरित भागातही ती टाकण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सभापतींकडे करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी लिकेजमुळे पाणी जमिनीत मुरत असावे, अशी शंका असून, त्यासंदर्भात सर्वे केला जाणार आहे आणि लिकेज आढळल्यास ते बुजविले जातील.
येत्या २१ मे रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, भाजपा शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ केला जाईल, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.
लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, भाजपा दक्षिण पश्‍चिम मंडळाचे अध्यक्ष रमेश भंडारी, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, मीनाक्षी तेलगोटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आशिष पाठक, सचिन कारळकर, श्रीपाद बोरीकर, सुरेंद्र पांडे, पर्यावरणप्रेमी गोपाळ ठोसर आदी मान्यवर पत्रपरिषदेला उपस्थित होते.