सोशल मीडियाच्या लाईक्सवरून हुशारीची गणना

0
108

– अरविंद कुमार यांची माहिती
– तंत्रज्ञानदिन साजरा
नागपूर, १७ मे
सध्याच्या काळात टेक्नॉलॉजीचा प्रभाव अतिशय जोमाने वाढत आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌स ऍप, इन्स्टाग्राम या सोशल साईटस्‌वर फोटो किंवा माहिती अपलोड केल्याशिवाय आताच्या पिढीला बरे वाटत नाही. त्यावर येणार्‍या लाईकवरून ते आपली सुंदरता, हुशारी ठरवतात. जगातील बहुतांश नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती टीसीएसचे उपकेंद्रीय प्रमुख अरविंद कुमार यांनी दिली.
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स आणि निवृत्त अभियंता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन ऍण्ड इन्फॉर्मेशन सोसायटी डे निमित्त कार्यक़्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर पी. के. कुळकर्णी, एम. डी. दाते आणि मिलिंद पाठक उपस्थित होते. अरविंद कुमार म्हणाले, टेलिकम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन यांच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत. सद्यःस्थितीत फेसबुक, चॅट, व्हॉट्‌स ऍपमुळे सहजता वाढली आहे. अनेकजण आपले जुने मित्र व नातेवाईकांशी सोशल साईट्‌समुळे जुळले आहेत. मर्यादित टेक्नॉलॉजी ते अमर्याद टेक्नॉलॉजी हा प्रवास अतिशय लवकर पार करण्यात आला. याच अमर्याद टेक्नॉलॉजीच्या आधारे २०२० चे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
टेक्नॉलॉजीमध्ये आता आर्टिफिशल इन्टेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आपल्या सूचनांवर चालणार्‍या प्राण्यापासून तर खरा मनुष्य वाटावा असे रोबोट या इन्टेलिजन्सच्या साहाय्याने तयार केले जातात. आपण कॅब बुक करतो, ऑनलाईन खरेदी करतो, बँकिंग या सर्व गोष्टी टेक्नॉलॉजी आणि टेलिकम्युनिकेशनमुळे शक्य झाल्या आहेत. जगातील सर्वात मोठे माध्यम हे फेसबुक आहे. कारण, त्यावर दर मिनिटाला काही ना काही अपलोड केले जाते. आपल्याला युझर एक्सिपिरियन्स घेता आला पाहिजे. आपण जी वस्तू किंवा साईट वापरतो त्याच्या प्रत्येक भागाविषयी माहिती असणे म्हणजे युझर एक्सिपिरियन्स होतो. आताच्या काळात युझर एक्सिपिरियन्स अतिशय महत्त्वाचे आहे. मेडिकल क्षेत्रातही टेक्नॉलॉजीचा वापर होतो. कोणत्याही आजाराचे निदान करून औषधोपचार करण्याआधी अनेक चाचण्या सांगितल्या जातात. त्या संपूर्ण चाचण्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतात. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका निभावते. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. धाबू यांनी केले.