शहरात उष्णतेची लाट

0
142

नागपूर ४५.२
– दोन आठवडे तापमान राहणार स्थिर
नागपूर, १७ मे
दोन दिवसांपासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला असून, पारा ४६.२ पर्यंत गेला आहे. बुधवारी नागपूर शहराचे तापमान ४५.२ अंश नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जाणवणार्‍या विखारी उन्हाचे चटके आता आणखी तीव्र झाले आहेत. मे महिन्यात अंगाची लाही लाही करणारे उन्ह विदर्भात तापते. या महिन्याच्या उत्तरार्धात तापमान आपल्या अंतिम चरणावर असते. सध्या विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे.
आगामी दोन आठवडे भीषण तापमानाचे म्हणजेच उष्णतेच्या लाटेचेच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम शहरवासीयांना रविवारपासूनच जाणवू लागला आहे. १९५४ मध्ये मे महिन्यात ४७.८ अंश इतके तापमान शहरात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर २०१३ च्या मे महिन्यात पारा तब्बल ४७.९ अंशांवर पोहोचला होता. २०१६ च्या मे महिन्यात ४६.६ अंश तापमानाची नोंद शहरात करण्यात आली होती. मे महिन्यानंतर जूनमध्ये पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने उष्ण व दमट वातावरण तयार होते. या वातावरणात उन्ह कमी असले तरी उकाडा प्रचंड जाणवतो. एकूणच शहरात आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.