नागपूर विभागात उष्माघाताचे २०४ रुग्ण

0
118

– एकट्या नागपुरात ६८ जणांना बाधा
नागपूर, १७ मे
यंदा फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासूनच उष्णता वाढण्यास सुरुवात झाली. सद्य:स्थितीत शहरातील तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशाजवळ आहे. परिणामी विविध आजारांमध्येही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात मुख्यत्वे उष्माघाताची भीती असते. सध्या नागपूर विभागात उष्मााघाताचे २०४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १५१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकट्या नागपूर शहरात ६८ रुग्ण आहेत. उष्माघाताच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने तापमानवाढीचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
सध्या उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने नागपूरकरांनी गारवा अनुभवला. मात्र, हा गारवा मोजके दोन दिवसच टिकला. त्यानंतर पुन्हा उन्हाच्या तडाखा जाणवायला लागला. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर ग्रामीण आणि शहर या भागात उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. सहा जिल्हे मिळून उष्माघाताचे २०४ रुग्ण आहेत. पैकी १५१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. विशेष असे की, यामध्ये उष्माघाताचा एकही बळी नाही. प्रशासनातर्फे तरीही उष्माघाताबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

मेडिकल- मेयोमध्ये नोंद नाही
नागपूर विभागात उष्माघाताच्या १५१ रुग्णांना दाखल करण्यात आले असताना मेडिकल आणि मेयोमधील कोल्ड वॉर्ड रिकामे आहेत. या दोन्ही रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.

गॅस्ट्रोचे दररोज ६-७ रुग्ण
सध्या गॅस्ट्रोचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येत असले तरी नागपूरच्या आयसोलेशन रुग्णालयात दररोज सुमारे ६-७ रुग्ण उपचारासाठी येत आहेत. सध्या या रुग्णालयात गॅस्ट्रोचे ८ रुग्ण भरती आहे. एप्रिल आणि मे महिन्यात गॅस्ट्रोचे सुमारे १५० रुग्ण उपचारासाठी आल्याची माहिती डॉ. एस. एस. शिंदे यांनी दिली.

जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा रुग्णसंख्या
भंडारा ५९
गोंदिया ७
चंद्रपूर ११
गडचिरोली ३५
नागपूर (ग्रामीण) ११
वर्धा १३
नागपूर (शहर) ६८