भाजपातर्फे ४५ मुस्लिम उमेदवारांना संधी

मालेगांव मनपा निवडणूक

0
174

मालेगाव (नाशिक), १८ मे 
स्थानिक महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने सर्वाधिक उमेदवार उभे असून, ८४ जागांपैकी ७७ जागांसाठी निवडणूक लढविणार आहे. विशेष म्हणजे यात तब्बल ४५ उमेदवार मुस्लिम आहेत.
मालेगांव महानगरपालिका ताब्यात घेण्याचा भाजपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. एकाच निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याचा विक्रम भाजपाने या निवडणुकीत केला आहे, तर मालेगावमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसने यंदाच्या निवडणुकीत ७३ उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) आघाडीने ६६ ठिकाणी उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहे. शिवसेनेने २५ जागांवर उमेदवार दिले आहेत. सध्या मालेगाव महानगरपालिकेत कॉंग्रेसचे २५, राष्ट्रवादी कॉंग्रेस २२ तर शिवसेनेचे ११ नगरसेवक आहेत.
पहिल्यांदाच मोठी उमेदवारी
भारतीय जनता पार्टीने निवडणुकीपूर्वीच इतिहास रचला आहे. एकाच निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याची पक्षाची ही पहिलीच वेळ असून, यापूर्वी देशभरातही कधीही इतक्या संख्येत मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही. (वृत्तसंस्था)