कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

0
103

– आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकला दणका
– हेर असल्याचा दावा फेटाळला
– आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा
द हेग (नेदरलँडस), १८ मे
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला असून अद्याप जाधव हे हेर आहेत की नाहीत हे सिद्ध न झाल्याचे सांगत ते रॉचे एजंट असल्याचा पाकिस्तानचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. पाकिस्तानने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी अंतिम निकाल येईपर्यंत करू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी निकालपत्राचे वाचन केले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
कुलभूषण जाधव यांच्या जिवाला धोका असून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंत फाशी देऊ नये. तसेच जाधव सुरक्षित असल्याची हमी द्या असेही न्यायालयाने सांगितले. आज दुपारी ३.३० वाजता न्यायालयाने निकाल वाचनास सुरुवात केली. यावेळी न्यायालयाने पाकिस्तानला चांगलेच फटाकरले. जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे, असेही न्यायालयाने सांगितले. कुलभूषण जाधव यांना भेटू देण्याची मागणी पाकिस्तानने पूर्ण करणे आवश्यक होते. तसेच १९७७ च्या व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदतही मिळायला हवी होती, असे सांगत न्यायालयाने पाकला फटकारले.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. भारताने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली होती. जाधव यांना ३ मार्चला अटक करून हेरगिरी व विध्वंसक कारवायांच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला, असा दावा भारताने न्यायालयात केला होता.
न्यायालयाने भारताच्या याचिकेवर फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. भारताची बाजू ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांनी मांडली होती. भारताने जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याची विनंती १६ वेळा केली होती. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तानने ती फेटाळली होती. त्यामुळे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असून, पाकिस्तानने मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते.
भारताने केलेला दावा पाकिस्तानने फेटाळून लावला होता. जाधव हे हेरच असून, आम्ही विचारलेल्या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे भारताला देता आलेली नाहीत, असे पाकिस्तानने म्हटले होते. पाकिस्तानने सुनावणीदरम्यान जाधव यांची चित्रफीत प्रदर्शित करण्याची परवानगी मागितली होती. भारतासाठी आपण हेरगिरी करत होतो, अशी कबुली जाधव यांनी चित्रफीतीत दिल्याचा दावा पाकने केला होता. मात्र, ही चित्रफीत बोगस असल्याचे सांगत ती प्रदर्शित करण्यास न्यायालयाने पाकला परवानगी नाकारली होती. पाकसाठी हा मोठाच धक्का असल्याचे मानले जात होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने लवकरच निकाल देऊ, असे सांगितले होते.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी ३ मार्च २०१६ मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीचे असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारून व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. माझ्या मुलाला यात अडकवण्यात आले आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
पाकचा कांगावा…
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय अमान्य
इस्लामाबाद : कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय पाकिस्तानने अमान्य केला आहे. कुलभूषण जाधव प्रकरण हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कक्षेबाहेरचे असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानने उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे.
भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल सुनावला. त्यानंतर काही वेळातच हा निकाल अमान्य असल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. तसेच जाधवसंदर्भात आम्ही सर्व पुरावे आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर ठेवू, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले.
मी खूप आनंदी : हरीश साळवे
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणात केवळ एक रुपया शुल्क आकारून आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे मूळ नागपूरचे प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी ‘मी खूप आनंदी आहे’ असे पहिल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात भक्कमपणे बाजू मांडल्यानेच कोर्टाने फाशीच्या निर्णयाला स्थगिती दिली असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयानंतर हरीश साळवे यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.