बॉलीवूडची ग्लॅमरस आई हरवली

0
114

मुंबई, १८ मे 
चित्रपटसृष्टीची आई म्हणून ओळखल्या जाण्यार्‍या सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांनी अंधेरीच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. बुधवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने कोकिळाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
रिमा लागू यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. नाटकात काम केल्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. त्यांनी नव्वदच्या दशकात मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले. अधिकाधिक चित्रपटात त्यांची आईची भूमिका असायची. एक प्रेमळ आईच्या भूमिकेमुळे त्या बॉलिवूडच्या ‘फेव्हरेट मॉम’ म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीसह सर्वांनाच धक्का बसला आहे.
रिमा लागू यांची गाजलेली नाटके
– पुरुष, बुलंद
– चल आटप लवकर
– सविता दामोदर परांजपे
– विठो रखुमाय
– घर तिघांचं हवं
– झाले मोकळे आकाश
– तो एक क्षण
‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, ‘आई शप्पथ’, ‘बिनधास्त’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्ता’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. रिमा यांना ‘मैने प्यार किया’ (१९९०), ‘आशिकी’ (१९९१), ‘हम आपके है कौन’ (१९९५) आणि ‘वास्तव’ (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.
रिमा लागू यांच्या मालिका
खानदान, श्रीमान-श्रीमती, तूतू-मैंमैंें, दो और दो पाच, धडकन, कडवी खट्टी मिठ्ठी, दो हंसो का जोडा, तुझं माझं जमेना, नामकरण.
मराठीतील अनेक चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका देखील केली आहे. सिंहासन, आंतरपाट, आपली माणसे, जिवलगा इत्यादी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
मैने प्यार किया या चित्रपटातील रिमा लागू यांची भूमिका फारच गाजली होती व त्यावेळी त्यांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास होते. इशात सलमानची आई साकारणे एक आव्हानच होते. परंतु रिमा यांनी त्यांच्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा इतकी छान साकारली की देशाला नवीन आईची ओळख झाली. आजही ‘मैंने प्यार किया’ म्हटलं की रिमा यांची ती व्यक्तिरेखा डोळ्यांसमोरून जात नाही.
घरातूनच अभिनयाचे धडे
रीमा लागू यांचा जन्म १९५८ मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यांचे ‘लेकुरे उदंड जाहले’ हे नाटक प्रचंड गाजले होते. रीमा लागू यांचे पुण्यात शालेय शिक्षण सुरू होते, त्याचवेळी त्यांना अभिनयाचे धडेही देण्यात आले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतले. त्यानंतर मराठी रंगभूमीवरून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाय ठेवला. विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर नयन भडभडे या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षानंतर दोघेही वेगवेगळे झाले. मृण्मयी लागू या रीमा लागू यांच्या कन्या. त्या स्वत:ही नाट्य, सिनेअभिनेत्री
आहेत.
पंतप्रधानाचा शोकसंदेश
रिमा लागू उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांनी दूरचित्रवाणी आणि चित्रपटांच्या क्षेत्रात आपल्या अभिनयाचा खोलवर ठसा उमटवला होता, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली. (वृत्तसंस्था)