केंद्रीय मंत्री अनिल दवे कालवश

0
122

– पर्यावरणवादी राजकारणी म्हणून ओळख
नवी दिल्ली, १८ मे 
केंद्रीय पर्यावरण मंत्री (स्वतंत्र प्रभार) अनिल दवे यांचे अखिल भारतीय वैद्यकीय संस्थानमध्ये (एम्स) उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मागील ६ महिन्यांपासून आजारपणांमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अनिल दवे २००९ पासून सलग दुसर्‍यांदा मध्यप्रदेशातून राज्यसभेवर खासदार होते. विद्यमान स्थितीत त्यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल या खात्यांचा स्वतंत्र प्रभार होता.
मध्यप्रदेशातील उज्जैनजवळील बडनगर गावात ६ जुलै १९५६ रोजी अनिल माधव दवे यांचा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा त्यांना आजोबा दादासाहेब दवे यांच्याकडूनच मिळाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रचारक म्हणूनही काम पाहिले. २००३ मध्ये ते पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रात पहिल्यांदा चमकले. दिग्विजय सिंह यांचे सरकार उलथवून भाजपला सत्ता मिळवून देण्यात एक संघटक म्हणून दवेंची मोठी भूमिका होती. तसेच, उमा भारती यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दवेंना सल्लागार म्हणून नेमले होते. शिवाय विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
पंतप्रधानांची श्रद्घांजली
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून अनिल दवे यांना श्रद्धांजली वाहिली. एका मित्राच्या आणि चांगल्या सहकार्‍याच्या अचानक निधनाने धक्का बसला आहे. समर्पित भावनेने जनतेची सेवा करणारे अनिल दवे कायम स्मरणात राहतील. पर्यावरण संवर्धन हा त्यांच्या ध्यासाचा विषय होता. मी त्यांच्याशी काही महत्त्वाच्या मुद्यांवर नुकतीच चर्चा केली होती. अनिल दवे यांच्या आकस्मिक निधनाने माझे व्यक्तिगत नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
ना. दवे यांच्या निधनाबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीदेखील शोक व्यक्त केला. अनिल दवे यांच्या आकस्मिक निधनाने आपणास धक्का बसला आहे.
एका चांगल्या सहकार्‍याच्या निधनाचे दु:ख आहे, असे ट्विट करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि स्मृती इराणी यांनीही दवे यांना आदरांजली वाहिली.
पर्यावरणवादी नेता गमावला ः मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देणारा साधा आणि निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल दवे यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या निमित्ताने मी दवे यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो. या प्रकल्पांना चालना देण्यासाठी त्यांनी तातडीने कार्यवाही केली होती. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कायमच स्मरणात ठेवेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक असलेले श्री. दवे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे, विनम्र आणि संवेदनशील होते,असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
पर्यावरणवादी मंत्री
पर्यावरणाविषयी संवेदनशील असलेल्या अनिल दवेंच्या भोपाळमधील घराचे नावही ‘नदी का घर’ असे आहे. नर्मदा हा त्यांच्या जगण्याचा विषय होता. एक राजकारणी, पर्यावरणप्रेमी याशिवाय त्यांची आणखी एक ओळख होती, ती कमर्शिअल पायलटची. पायी नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी नदीप्रेमामुळे नर्मदेची हवाई परिक्रमाही स्वतः विमान चालवून पूर्ण केली. नर्मदा समग्र या एनजीओच्या माध्यमातून नर्मदा संवर्धनासाठी मोठे काम केले. ते सध्या नर्मदेच्या संवर्धनाची प्रमुख जबाबदारी सांभाळत होते. मृत्यूनंतर नर्मदेच्या काठावरच आपला देह विसावा, अशी त्यांची इच्छा होती. होशंगाबादमधील बांद्राभानला ज्या ठिकाणी नर्मदा महोत्सव होतो, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर ‘शिवाजी और सुराज’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. छत्रपतींच्या पराक्रमांना, त्यांच्या प्रशासकीय कौशल्यांना ठळकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला.
वैयक्तिक नुकसान : सरसंघचालक
केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान झाले, अशा शब्दात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
आपल्या शोकसंदेशात डॉ. भागवत लिहितात- अनिल दवे भोपाळ विभाग प्रचारक असतानापासून माझे निकटचे मित्र आहेत. विभाग प्रचारक, भाजपाच्या विविध पदांवर कार्य करणारा तसेच नर्मदा व इतर नद्यांच्या जलव्यवस्थापन व पर्यावरणाबाबत जागरण अभियान चालविणारा कार्यकर्ता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व नेतृत्वाचा अभ्यासक तसेच केंद्रीय मंत्री म्हणून कार्य करताना मी त्यांची योजना, कुशलता, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट दृष्टी, संवेदनशीलता, सौम्य व्यवहार तसेच दूरदृष्टी जवळून बघितली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने, भाजपाने तसेच समाजाने एक कुशल, अदम्य इच्छाशक्तीचा सात्त्विक कार्यकर्ता गमविला आहे. त्यांच्या अभावाचे दु:ख सहन करीत, कर्तव्यमार्गावर पुढे जाणे हेच आम्हांसर्वांना अनिवार्य प्राप्तकर्तव्य आहे… असे नमूद करून सरसंघचालकांनी त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. (वृत्तसंस्था)