त्रिशंकू

0
76

मेट्रोतल्या बायका
शरयुचं विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलं. सामानासह ती बाहेर आली, तेव्हा ऐन दुपार असल्यामुळे महानगरात ऊन रणरणत होतं. बाहेर क्षणभर वावरणंसुद्धा कठीण होत होतं. उष्म्यानं जिवाची काहिली होत होती. त्यात हवेतल्या दमटपणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. आधीच ठरवलेल्या टॅक्सीत बसून आता तिला गोरेगावला मावसबहिणीकडे जायचं होतं. नद्या, पाणी या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी म्हणून ती मुंबईत आली होती. याच विषयावर नुकतीच तिनं अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती आणि जलविशेषज्ञ या नात्यानं तिनं सिंगापूरमध्ये नुकतंच काम केलं होतं. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विशेष आमंत्रितांपैकी ती एक होती. दोन दिवसांनी परिषद सुरू होणार होती, पण जेट लॅग, जमलं तर पर्यटक म्हणून थोडंसं मुंबई दर्शन, आपल्या संस्कृतीचा शोध घेणं म्हणून तिनं दीड दिवस आधी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. मुंबईतल्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा होत्या, माणसांची गर्दी होती. ही एवढी गर्दी अमेरिकेत तरी दुर्मिळ होती. टॅक्सीच्या काचेतून ती कुतूहलानं त्या गर्दीचं, लोकांचं निरीक्षण करू लागली.
‘‘अमेरिकन बॉर्न कन्फ्यूज्ड देसी-एबीसीडी-असं लोक तुम्हाला भले म्हणोत, तुम्ही अजिबात कन्फ्यूज्ड नसून, अमेरिकेत राहणार्‍या भारतीय आईबाबांच्या, अमेरिकेत जन्मलेल्या नि भारतीय संस्कृतीचा आणि अमेरिकन राहणीचा उत्तम मेळ साधलेल्या छान सुसंस्कृत मुली आहात,’’ शरयुच्या आईनं तिला आणि सिंधूला-तिच्या बहिणीला लहानपणी सांगितलं होतं. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या तिच्या आईबाबांनी नोकरी लागताच लग्न करून अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. बाहेर इंग्लिश आणि घरात मात्र मातृभाषेत बोलण्याचा, आपली भाषा, आपली संस्कृती तिथेही जपण्याचा प्रयत्न त्यांनी इतकी वर्षं केला होता, तो हेतू बर्‍याच प्रमाणात साध्यही झाला होता.
‘‘आई तू आम्हा बहिणींची नावं नद्यांचीच बरी ठेवलीस! तुला माहिती होतं का, मी मोठी झाल्यावर नद्या आणि पाणी या विषयात पीएच.डी. करायचं ठरवणार आहे म्हणून?’’ पीएच.डी.ला ऍडमिशन मिळाल्यावर गमतीनं शरयुनं आपल्या आईला विचारलं होतं.
‘‘मुद्दाम ठरवून नाही, पण बघ, माझं नाव कावेरी, मावशीचं नाव कृष्णा, माझ्या आईचं नाव गंगा. तिच्या एका बहिणीचं नाव सरस्वती, दुसरीचं गोदावरी… कसं निर्मळ वाटतं गं ही सगळी नद्यांची नावं उच्चारली की. पाण्याचा तो अखंड प्रवाह अदृश्य रूपानं मनातल्या मनात वाहू लागतो. नदीचं स्फटिकासारखं स्वच्छ, थंडगार पाणी बंद डोळ्यांपुढेही दिसू लागतं, स्पर्श करू लागतं. लहानपणी आई आम्हाला आंघोळ करताना गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी आणि कृष्णा या सप्तनद्यांना वंदन करायला सांगायची. त्यांचं पाणी या ना त्या स्रोतांतून येऊन आमचं मलीन झालेलं अंग निर्मळ करतं, आमची तहान भागवतं म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचं स्मरण करायचं,’’ आईने सांगितलं होतं, म्हणजे थँक्सगिव्हिंगच ते एकप्रकारचं!
भारतीय संस्कृतीत नदी म्हणजे केवळ पाण्याचा स्रोत किंवा साठा नाही, तर त्याही पलीकडे जाऊन ती जीवनदायिनी, देवतास्वरूप मानली गेलेली आहे. सरस्वती ही ब्रह्मा, यमुना ही विष्णू आणि गंगा ही महेश अर्थात शिवस्वरूप मानली गेली आहे. गंगेत स्नान केल्यानं जन्मजन्मांतरीचं पाप नष्ट होतं, असं आम्ही भारतीय मानतो. मृत्युसमयी मनुष्याच्या तोंडी गंगाजल आणि तुळशीचं पान ठेवलं जातं. शरयुनं आपल्या पीएच.डी.च्या सादरीकरणात प्रोफेसर्स, परीक्षक आणि तिची प्रश्‍नोत्तरं ऐकण्यासाठी पुढ्यात येऊन बसलेले इतर विद्यार्थी यांना उद्देशून सांगितलं होतं.
‘‘आम्ही भारतीय? वी इंडियन्स? पण तू तर अमेरिकन नागरिक आहेस!’’ कुणीतरी शंका काढली होती.
‘‘हो आहे ना! पण माझं मूळ तर भारतीय आहे ना! आवर रूट्स आर इन इंडिया. इन मुंबई आणि आम्ही मूळ संस्कृती आणि इथली संस्कृती, अशा दोन्ही संस्कृतींचा संगम साधलाय… दोन स्वतंत्र वाहणार्‍या नद्या नंतर एक होऊन नव्या रूपात वाहू लागावी तसं काहीसं… येस, वी आर एबीसीडी-अमेरिकन बॉर्न कल्चर्ड देसी ऍण्ड नॉट अमेरिकन बॉर्न कन्फ्यूज्ड देसी!’’ तिनं बाणेदारपणे तिथल्या तिथे उत्तर दिलं होतं. पीएच.डी.च्या आपल्या सादरीकरणात तिनं पाणी आणि नद्या यांच्याबद्दल शास्त्रीय, वैज्ञानिक आणि भूगोलीय विवेचनाबरोबरच भारतीय संस्कृतीबद्दलही भरपूर माहिती दिली, तेव्हा विद्यापीठाच्या त्या प्रचंड मोठ्या हॉलमध्ये उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. परीक्षेच्या वेळी परीक्षार्थीने सर्वांसाठी अल्पोपहार आणून ठेवण्याची प्रथा असल्यामुळे शरयुनं तिथे ठेवलेले छोटे समोसे आणि चटणी, छोटी इडली आणि चटणी यावर व्हेरी टेस्टी म्हणत ताव मारला होता.
‘‘हॅव यू व्हिजिटेड इंडिया रिसेंटली?’’ तुझ्या बोलण्यानं प्रभावित होऊन मी आता भारतात प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार आहे. कुणीतरी तिला भारावून म्हटलं, तेव्हा प्रत्युत्तरादाखल स्मितहास्य करताना शरयु अंतर्मुख झाली होती. लहानपणी जाणं व्हायचं, एवढ्यात अनेक वर्षांत गेले नाहीये! तिनं मनोमन स्वत:लाच उत्तर दिलं होतं. म्हणूनच संधी मिळताच तिनं मुंबईतल्या त्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आलेल्या आमंत्रणाचा सहर्ष स्वीकार केला होता. हॉटेलमध्ये न थांबता, आल्यासारखं मावसबहिणीकडे उतरायचं तिनं ठरवलं होतं. चार दिवस भारत आणि भारतीय संस्कृती नीट अनुभवून तो मौलिक ठेवा तिला नेहमीसाठी जपून ठेवायचा होता.
‘‘रस्त्यावर आज इतकी गर्दी कशाची आहे?’’ तिनं न राहवून टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं.
‘‘अमेरिका से वो यंग पॉप सिंगर आया है ना, उस की भीड़ है. लड़के-लड़कियॉं दीवाने है उसके. सब उसके फोटो और नाम छपे हुए टीशर्ट पहनकर घूम रहे है|’’ टॅक्सी ड्रायव्हरनं इत्थंभूत माहिती दिली. इतका वेळ चूप बसण्याची त्याला सवय नसावी. ‘‘अरे मॅडम, १९९६ में पहले अमेरिका का पॉप सिंगर आया था, तब इससे भी ज्यादा भीड़ थी. उसने जिससे शेक हॅन्ड किया, उसने एक हफ्ता हाथ ही नहीं धोया,’’ त्यानं सांगितलं.
बापरे! आणि अमेरिकेत असलेले भारतीय लोक लांबवर प्रवास करत, प्रसंगी दुसर्‍या शहरात घेऊन जाऊन आपापल्या मुलामुलींना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणा, भरतनाट्यम, कथ्थक यासारखे भारतीय नृत्यप्रकार म्हणा, शिकवण्यासाठी मेहनत घेताहेत, मुलांना शुभंकरोति, रामरक्षा म्हणता यावी, म्हणून मेहनत घेताहेत. आपण भारतीय संस्कृतीच्या शोधात भारतात फिरणार आहोत, इथे मात्र तरुणाई अमेरिकेतल्या गायकांच्या मागे लागलीये.
मावसबहिणीनं तिचं छान स्वागत केलं, छान बडदास्त ठेवली. शरयुनं थोडी विश्रांती घेतल्यानंतर जवळ असलेला मॉल दाखवायला घेऊन गेली. सर्वत्र इंग्लिशमधले बोर्ड, इंग्लिशमध्ये बोलणारी तरुणाई… आपण अमेरिकेत आहोत की भारतात? तिला प्रश्‍न पडला आणि तिथे अमेरिकेत आपल्या पालकांसह अनेक पालकांनी आपल्या मुलांना आपली मातृभाषा आणि हिंदी यावी, म्हणून किती धडपड केलीये. इथे भारतीय वेश परिधान केलेल्या फारच थोड्या दिसताहेत, आपण अट्टाहासानं साड्या नेसणार आहोत त्या परिषदेत! आपल्या कल्पनेतला भारत दिसतच नाहीये फारसा, दिसतोय तो इंग्रजाळलेला इंडिया! मनातल्या मनात ती कष्टी झाली.
त्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शरयुनं समरस होऊन नद्या आणि पाण्याशी संबंधित भारतातल्या वक्त्यांनी भारतातल्या समस्यांबद्दलचं केलेलं विवेचन ऐकलं. पाण्याचा अपव्यय, प्रदूषित झालेल्या नद्या, खेड्यांतलं पाण्याचं प्रदूषण वेगळं, शहरांतलं पाण्याचं प्रदूषण वेगळं! भारत खरं म्हणजे किती भाग्यवान आहे, जिथे इतक्या नद्या आहेत, जिथे एवढी जलसंपदा आहे, नाहीतर काही देश! त्यांच्याजवळ नद्या नाहीत, त्यांना दुसर्‍या देशातून बर्फाच्या लाद्यांच्या रूपात पाणी आणून साठवावं लागतं! मात्र त्यांनाच पाण्याची खरी किंमत कळली आहे. दुसरा एक देश तर पाण्याचा थेंब वाया घालवणं म्हणजे रक्ताचा थेंब वाया घालवण्यासारखं मानतो. खरं आहे. एखादी वस्तू मुबलक, सहजासहजी उपलब्ध असेल, तर लोकांना तिची किंमत रहात नाही. तिच्या मनात आलं.
आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दलची सविस्तर बातमी टीव्हीवर देण्यासाठी आलेल्या पत्रकारानं शरयुला तिचे विचार मांडायची विनंती केली. ‘‘प्लिज, तुमच्या जवळ असलेल्या नद्या हा केवढा मौलिक ठेवा आहे, याचं भान असू द्या. जगात ऍमेझोन, नाईल, यांगत्से किंवा मिसिसिपी, मिसौरी कितीही मोठ्या नद्या असल्या तरी त्यांच्यामध्ये स्नान करून पापक्षालन करायला कोणी जात नाही. त्यांना कुणी देवतास्वरूप मानत नाही. पाण्याचे अजस्त्र साठे असलेल्या त्या केवळ नद्या आहेत. पण गंगेत स्नान करून पापक्षालन होतं, म्हणून लोक गंगेवर जातात; आंघोळीसाठी पाणी उपलब्ध आहे, म्हणून नाही! आपल्या नद्यांसह तिची संस्कृतीही जनामनात वाहते आहे. तुम्ही तुमची ही संस्कृती जपा, संस्कृतीच नष्ट झाली, तर मग जगायला आधार तो काय उरेल? तेव्हा संस्कृती जपा, नद्यांना जपा, त्यांना घाण करू नका, प्रदूषित करू नका.’’ शरयुनं कळकळीनं विनवलं.
‘‘पण मॅडम, तुम्ही तर अमेरिकेच्या नागरिक आहात, असं तुमचं वेबपेज सांगतं, मग तुम्हाला भारताबद्दल इतकी आत्मीयता कशी? आणि भारतात आता आहेच काय!’’ पत्रकारानं शरयुला म्हटल्यावर तिच्या मनात संतापाची नि दु:खाची बारीक कळ उमटली. ‘‘म्हणजे काय? आमचं मूळ तर भारतीय आहे! आणि भारतात काय नाही? डोळे उघडून बघाल, तरच दिसेल तुम्हाला!’’ तिनं संयतपणे म्हटलं आणि त्या पत्रकाराला निरोप दिला.
ती आंतरराष्ट्रीय परिषद आटोपून, मावसबहिणीचा निरोप घेऊन शरयु परत अमेरिकेला निघाली.
तिची टॅक्सी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रोखानं निघाली, तेव्हा तिनं पुढ्यातला भारत नजरेत साठवून घेतला. कुठे सोसायटीच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई होत असल्यामुळे हजारो लिटर पाणी फेकून दिलं जात होतं, कुठे गाड्यांची धू-पूस करण्यासाठी भरमसाठ पाणी वापरलं जात होतं, तर कुठे सार्वजनिक ठिकाणच्या नळांवर हंडे-कळशांच्या रांगा लागल्या होत्या, पाण्यासाठी बायकांची भांडणं सुरू होती.
‘‘आई, मी निघालेय परत अमेरिकेत यायला. चार तासांनी फ्लाईट आहे.’’ शरयुनं आईला फोन करून सांगितलं, ‘‘थोडा भारत आणलाय सोबत; पण अमेरिकेत तुझ्या नि माझ्याजवळ जास्त भारत आहे गं, तोच पुरवू या आयुष्यभर!’’ तिनं म्हटलं. आपण खरं म्हणजे त्रिशंकूसारखे झालो आहोत, तो कसा; धड स्वर्गात नाही नि धड पृथ्वीवर नाही, तसे आपण धड अमेरिकन नाही, धड भारतीय नाही. धड आधुनिक नाही, धड जुन्या विचारांचे नाही. त्याच्यासारखे डोकं खाली, वर पाय करून आपल्यासकट सगळे वावरताहेत झालं!
तिची टॅक्सी विमानतळाजवळ पोहोचली, ती मात्र मनानं कधीच अमेरिकेत, तिच्या मायदेशी पोहोचली होती.
*******
‘‘ये शोभा! आगुदर हात-पाय धूजो, मंग म्या भाकर-तुकडा ओवाळून टाकतो, गरम गरम पिठलं भाकरी खाजो मंग आंग टाकजो जरासं.’’ अनेक दिवसांनी बोलावल्यानंतर अखेरीस लेक माहेरपणाला आली या आनंदात शारदाबाई हरखून गेल्या होत्या. या खेडेगावात त्यांचं आयुष्य गेलं होतं, फार फार तर तालुक्याच्या गावी त्या एकदोनदा गेल्या होत्या. त्यांच्या लेकीनं मात्र थेट मुंबई गाठली होती. आपण शिकलो नाही, निदान पोरीला तरी शिकवावं म्हणून नवर्‍याच्या मागे लागून, पोटाला चिमटा घेऊन, त्यांनी लेकीला शिकवलं होतं. मग हौसेनं लग्न करून दिलं होतं. होतकरू जावयानं मुलीला आणखी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं आणि त्या शिक्षणाच्या बळावर नोकरीही मिळवून दिली होती. दोघांचा संसार मुंबईतल्या छोट्याशा खोलीतही गुण्यागोविंदानं सुरू होता. अखेरीस तिच्या आईवडिलांच्या आग्रहाखातर जावयानं, आपल्याला सुटी मिळत नाहीये, लेकीला येऊ द्या दोन दिवसांसाठी, मग एकदम सात महिन्यांनी पाठवतो दोन-तीन महिन्यांसाठी, म्हणत गोड बातमी पण कळवली होती म्हटल्यावर लेकीला कधी एकदा बघतो, असं शारदाबाईंना वाटू लागलं होतं. मुलगी आता परक्याचं धन झाली असली, तरी शेवटी मुलगी ती मुलगीच ना! त्यांनी लगेच तिच्या बाबांना तिला घेऊन येण्याची आणि दोन दिवसांनी पुन्हा पोहोचवून देण्याची गळ घातली.
‘‘आई बाबांना कशाला त्रास? मी एकटीच येते! आई अगं मी आता शहरवासी झालीये. या महानगरात राहून मनुष्य स्मार्ट होतो आपसूकच.’’ लेकीनं म्हटलं होतं. पण शारदाबाईनी तिचं नं ऐकता लगेच तिच्या बाबांना रवाना केलं होतं, जावयासाठी खास लाडू करून पाठवले होते.
‘‘आई, हे हात-पाय धुणं ठीक आहे, पण भाकर तुकडा वगैरे नको बाई ओवाळून टाकूस. कसल्या जुन्या-पुराण्या प्रथा आपण पाळत बसलोय!’’ लेकीनं निषेध नोंदवला. ‘‘आगं आसं काय करतीया! जुन्या गोष्टींना कशापायी नाक मुरडावं?’’ शारदाबाईंनी अखेर मनातल्या मनात तिच्यावरून भाकर-तुकडा ओवाळून टाकला.
‘‘आई शहरात, त्यातून मुंबईसारख्या महानगरात नाही गं असल्या जुनकट विचारांना कोणी कवटाळून बसत. तू पण हो बरं शहरातल्यासारखी आधुनिक! मॉडर्न! आणि शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करायचा. अशी गावठी भाषा नको आणि गावठी रीतीभाती नकोत!’’ तिनं म्हटलं. तिच्या आईनं त्यावर मंद स्मित करीत नुसतीच मान डोलावली. आता माही लेक गोर्‍या मडमेवानी यस-फ्यस बोलते, तं मले तं तिचं बोलनं ऐका लागन! पन गाववाल्याईंनी मले इचारलं का शारदाबाई तुमी आसं काऊन सन्यानं करता तं मी त्याइनले काय सांगू? ह्ये आसं खालती डोकं न वरती पाय करून आधार नसल्यावानी काऊन राहावं आपन? आपल्या आपल्या गावाची पन येक रीत-भात असतीया. आपन समद्याईनी आपली समदी रीत-भात सोडली तं आपली सौंस्कृती कशी र्‍हाईन? आन शहरातल्या लोकावानी पार समद्याईनी रहाचं म्हनलं तं मंग आपलं येगळेपन कुटं आलं? ते येगळे, आपन येगळे. गरम गरम पिठलं भाकरी लेकीच्या पानात वाढत शारदाबाई म्हणाल्या, आणि आता बाकी सगळं नंतर, पहिले जेव पोटभर! अनेक दिवसांनी जेवावं तशी माहेरवाशीण लेक पोटभर जेवली, तेव्हा स्वतः शारदाबाईच तृप्त झाल्या.
मागची आवराआवर करण्यात आईला मदत केल्यावर हौसेनं घेतलेला टीव्ही शारदाबाईंनी लेकीला दाखवला. तो काही त्यांना सुरू करता येत नव्हता. लेकीनं तो सुरू केला. कौतुकानं माय-लेक टीव्ही पाहू लागल्या.
आपला महाराष्ट्र विविधतेनं नटला आहे. आपली मराठी भाषा वर्‍हाडी, खानदेशी, मालवणी या बोलीभाषांनी आणि त्या त्या प्रांतातल्या संस्कृतीनं समृद्ध झाली आहे. अगदी खेड्यापाड्यांतून बोलली जाणारी गावरान प्रांतीय भाषा, हासुद्धा आपला मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. टीव्हीवर कार्यक्रम सादर करणारी सूत्रधार म्हणाली, ‘‘बहिणाबाई चौधरी या लौकिकार्थानं अशिक्षित, पण अहिराणी म्हणजे खानदेशी बोलीभाषेतून अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचं तत्त्वज्ञान व्यक्त करणारं काव्य त्यांनी लिहिलं. खानदेशातील आसोद हे बहिणाईंचं जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी अहिराणी भाषा त्यांच्या कवितेतून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकर्‍यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग या सार्‍यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती, असं त्यांच्या कवितेतून दिसून येतं. वर्‍हाडी प्रामुख्याने विदर्भाच्या वर्‍हाड भागात बोलली जाते. या बोलीची पाळंमुळं १२ व्या शतकातल्या, चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाच्या उदयापर्यंत जातात.’’ सूत्रधार म्हणाली, तसं कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाषातज्ज्ञांनी बोलीभाषाही टिकवून ठेवायचं प्रेक्षकांना आवाहन केलं. एक भाषा मृत झाली की भाषेबरोबर एक संस्कृतीही नष्ट होते, तेव्हा बोलीभाषा आणि संस्कृती नष्ट होऊ देऊ नका. त्यांनी म्हटलं, तेव्हा शारदाबाई स्मितहास्य करीत उठल्या.
‘आरं खोप्यामंदी खोपा सुगरनीचा चांगला, येका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला…’ शारदाबाई गाऊ लागल्या, तेव्हा आश्‍चर्यचकित होऊन त्यांची लेक आईकडे बघू लागली.
‘‘दोन जिवाईंची झाली हायेस ना, कळन तुलेबी ह्याचा आर्थ लौकरच… ह्येचं बटन ह्ये आसं बंद कराचं न्हवं? चाल आता आंग टाकजो जरासं! लई दमलीया ल्येक माजी!’’ शारदाबाई तिच्या केसांवरून हात फिरवीत म्हणाल्या. तशी लेक त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांना बिलगली.
‘पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला…’ लेकीला थोपटता थोपटता त्या बहिणाबाईंची कविता गाऊ लागल्या.
दूर महानगरात उन्हानं जिवाची काहिली होत होती. महानगरापासून दूर शारदाबाईंच्या खेड्यात, त्यांच्या मोडक्या-तोडक्या टीचभर घरात उन्हापासून रक्षण करत सुगरणीनं आपल्या पिल्लावर मायेची सावली धरली होती.
– रश्मी घटवाई
९८७१२४९०४७