पुढील वर्षी तीन उपग्रहांचे प्रक्षेपण

0
82

– इंटरनेट सेवा वेगवान होणार
– स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी उपयुक्त
नवी दिल्ली, १८ मे 
देशातील इंटरनेट सेवा अधिक वेगवान करण्यासाठी इस्रोकडून जीसॅट-१९, जीसॅट-११ आणि जीसॅट-२० या तीन उपग्रहांचे प्रक्षेपण पुढील वर्षी इस्रोकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, या उपग्रहांचा वापर स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील संपर्क यंत्रणांसाठी होणार आहे.
पुढील दीड वर्षात इस्रोकडून ३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, दूरसंचार क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. दूरसंचार क्षेत्रासाठी उपग्रहांचे प्रक्षेपण केले जात असल्याने इंटरनेट सेवा वेगवान आणि स्वस्त होणार आहे. जीसॅटमुळे इंटरनेटचा सध्याचा वेग १ गिगाबाईट प्रती सेकंद इतका असून, जीसॅट-१९ मुळे हा वेग ४ गिगाबाईट प्रती सेकंद इतका होईल. तसेच, या उपग्रहाची क्षमता सध्याच्या उपग्रहाच्या तुलनेत चारपटीने अधिक असेल, अशी माहिती अहमदाबादमधील स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटरच्या तपन मिश्रा यांनी दिली आहे. ‘जीसॅट-११ इस्रोचा सर्वाधिक वजनदार उपग्रह असणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये इस्रोकडून जीसॅट-११ चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे इंटरनेटचा वेग १४ गिगाबाईट प्रती सेकंदावर जाऊन पोहोचणार आहे, तर जीसॅट-२० चे प्रक्षेपण पुढील वर्षाच्या अखेरीस प्रक्षेपित करण्यात येईल.
आता वायरलेस टीव्ही
व्हॉईस आणि व्हिडीओमुळे झालेला संपर्क क्षेत्रातील बदल आपण सर्वांनी अनुभवला आहे. मात्र, येत्या काळात तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून वायरलेस तंत्रज्ञानाने टीव्ही पाहता येणे शक्य होणार आहे. इस्रोकडून करण्यात येणार्‍या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणामुळे भविष्यात हे सर्व शक्य होणार आहे, असे स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटरचे तपन मिश्रा यांनी म्हटले आहे.