भारतीय लष्कराला तीन दशकानंतर मिळणार नव्या तोफा

0
55

नवी दिल्ली, १८ मे
भारतीय लष्कराला तब्बल तीन दशकानंतर नव्या तोफा (आर्टिलरी गन्स) मिळणार असून भारतात अमेरिकेहून दोन अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा आणण्यात आल्या आहेत. राजस्थानमधील पोखरणमध्ये आज या तोफांची चाचणी घेण्यात येणार आहे.
२०१० पासून अमेरिकेकडून एम ३७७ तोफांच्या खरेदीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया मागील वर्षी २६ जून रोजी पूर्ण झाली. अमेरिकेकडून आता भारत १४५ तोफा खरेदी करणार आहे. यासाठी २९०० कोटींचा करार करण्यात आला आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये ‘फॉरेन मिलिटरी सेल्स’च्या माध्यमातून हा करार करण्यात आला आहे.
एम ३७७ तोफांमध्ये भारतीय वातावरणात भारतीय दारूगोळ्यासह मारा करण्याची क्षमता असून एम ३७७ तोफांचा वापर सध्या अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्कराकडून केला जातो. इराक आणि अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा एम ३७७ तोफांचा वापर करतात.
दोन एम ३७७ तोफांची चाचणी पोखरणमध्ये करण्यात आल्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये आणखी तीन तोफा भारतात आणल्या जाणार आहेत. या तोफांचा वापर जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे.
यानंतर मार्च २०१९ ते जून २०२१ या कालावधीत दर महिन्याला पाच एम३७७ तोफा भारतीय लष्करात दाखल होणार आहेत. २४ ते ४० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची एम ३७७ तोफांची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)