कार्ती चिदम्बरम्‌विरुद्ध ईडीही दाखल करणार एफआयआर

0
57

नवी दिल्ली, १८ मे 
माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदम्बरम् यांचा पुत्र कार्ती चिदम्बरम् याच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केल्यानंतर आता बेनामी संपत्तीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) कार्ती याच्यासह आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.
विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप या दोघांवर आहे. दरम्यान, सोमवारी सीबीआयनेही कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता.
सीबीआयच्या एफआयआरची प्रत आम्हाला मिळाली असून लवकरच काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी कार्ती चिदम्बरम् आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत, अशी माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.
सीबीआयने या दोघांविरोधात ईडीने केलेल्या छापेमारीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे एफआयआर दाखल केला होता.
एअरसेल-एक्सिस प्रकरणात याआधीच कार्ती यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांची वासन हेल्थकेअरमध्ये विदेशी गुंतवणूक केल्याच्या प्रकरणातही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, ईडीने एफआयआर दाखल केल्यास याप्रकरणात कार्ती चिदम्बरम् यांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता वाढली आहे. (वृत्तसंस्था)