रजनीकांतचे भाजपात स्वागतच : एच. राजा

0
81

चेन्नई, १८ मे 
तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची एकीकडे चर्चा चालू असतानाच भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्याने त्यांना आमंत्रण दिले आहे. रजनीकांत हे लोकप्रिय व्यक्ती आहेत आणि भाजपामध्ये त्यांचे स्वागतच आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस एच. राजा म्हणाले.
भाजपाने रजनीकांत यांच्याशी संपर्क साधला आहे का, असा प्रश्‍न विचारला असता एच. राजा म्हणाले, रजनीकांत यांनी आधी राजकारणात यायचे की नाही, याचा विचार करावा.
त्यांना राजकीय पक्ष स्थापण्याचा तसेच राजकारणात येण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांनी आतापर्यंत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागेल आणि लक्ष ठेवावे लागेल, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये सामील होऊ इच्छिणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत आहे, असेही राजा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
रजनीकांत हे आपल्या चाहत्यांची भेट घेत असून राजकारणात येण्याबाबत त्यांनी नुकतेच सूतोवाच केले होते. मी राजकारणात आलो तर फक्त पैशांचा विचार करणार्‍या व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखवेन, असे ते म्हणाले होते.
(वृत्तसंस्था)