शरद पवारांनी फेटाळला सोनिया गांधींचा प्रस्ताव

राष्ट्रपतिपदाची निवडणूक

0
97

नवी दिल्ली, १८ मे 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उमेदवार होण्यासाठी ठेवलेला प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. कॉंग्रेसला मात्र शरद पवार यांनी प्रस्ताव धुडकावून लावल्याने मोठा धक्का बसला आहे.
सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यात पार पडलेल्या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यांनी तो धुडकावून लावला. माझा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विचार केला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ही निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक नसल्याचे शरद पवारांनी याआधीही स्पष्ट केले असल्याचे मलिक यांनी सांगितले. राष्ट्रपतिपदाची उमेदवारी शरद पवारांनी स्वीकारावी, अशी संपुआच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले होते की, रालोआकडे राष्ट्रपतिपदासाठी स्वत:चा उमेदवार जिंकवण्यासाठी आवश्यक बहुमत असल्यामुळे या निवडणुकीत मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाही.
कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढण्यासाठी उमेदवार उभा करण्याची जबाबदारी घेतली असून यासाठी सर्व विरोधी पक्षांशी चर्चा केली जात आहे. या संदर्भात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. यानंतर ममतांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. सोनिया गांधी यांनी यासंबंधी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माकपचे सीताराम येचुरी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपत आहे. (वृत्तसंस्था)