चाराखाऊंचे द्वेषी चर्वण

0
48

प्रासंगिक
भय्या, बिहार हमारा है चे नारे लावणारे आणि ९५० कोटींचा चारा फस्त करून कोट्यवधींचा ढेकर देणारे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये नुकतीच भर पडली. सर्वोच्च न्यायालयाने चारा घोटाळ्यासंबंधीचे लालूंवरील सर्व खटले एकत्र न करता वेगवेगळे चालविण्याचे आदेश दिल्याने लालूंच्या पायाखालची जमीन सरकली आणि मग काय, अटकेच्या भीतिपोटी लालूभय्यांचा आधीच ढासळलेला तोल अधिकच घसरला आणि हे बिहारी राजेशाहीत वावरणारे चाराखाऊ यादव, मोदी व त्यांच्या धोरणांवर टीका करण्यासाठी जीभ सैल सोडून बोभाटा करू लागले.
ठीक तीन वर्षांपूर्वी, १६ मे २०१४ रोजी भारतवासीयांनी दिलेल्या ऐतिहासिक जनमतामुळे मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. या तीन वर्षांत सामान्य जनतेचा नाही तर भाजप आणि रा. स्व. संघाचा फायदा झाल्याची ओरड लालूंनी केली. इतकेच नव्हे, तर मोदींमध्ये हिंमत असेल, तर लोकसभा बरखास्त करून त्यांनी निवडणुकांना सामोरे जावे, असा विनाशकाले विपरीत बुद्धीतून उपजलेला सडका सल्ला देऊनही लालू महाशय मोकळे झाले.
त्यामुळे इतर विरोधकांसह लालूंनीही २०१९ ची चांगलीच धास्ती घेतली असून, मोदींसमोर काही आपला टिकाव लागणार नाही, याची पूर्ण भीती लालूंना सतावतेय. तेव्हा उगाच मोदींवर, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून निव्वळ विरोधासाठी विरोध प्रदर्शन करायची ही बिहारी खोड लालूंना आगामी निवडणुकीत तोंडावर आपटविल्याशिवाय राहणार नाहीच. प्रादेशिक अस्मितेच्या बळावर बिहारमध्ये गुंडाराजची पैदास करणार्‍या लालूंना नीती आयोगाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा दिलेला सल्ला चांगलाच झोंबला. कारण सरळ आहे, जर का राज्य आणि केंद्राच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या, तर केंद्रात खासदार तर सोडाच, राज्यातही कितपत आमदार निवडून येतील की नाही, याचीही लालूंसारख्या कसलेल्या राजकारण्यांना आता शाश्‍वती राहिलेली नाही. त्यामुळे संघराज्यीय पद्धत ध्वस्त करण्याचा आणि प्रादेशिक पक्षांना नेस्तनाबूत करण्याचा मोदी सरकारचा कुटिल डाव असल्याचा कांगावा करणार्‍या लालूंना आता पळता भुई थोडी झाली आहे. त्यामुळे चाराखाऊ लालू असो वा मुस्लिमधार्जिण्या ममता, यांची प्रादेशिकतेच्या राजकारणावर आताच गटांगळ्या खाणारी नाव भविष्यात तळ गाठणार हे नक्की!
नितीशकुमारांची नीतिमत्ता
एकीकडे अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव, ममतादीदी, उद्धव ठाकरे यांसारख्या आपापल्या राज्यांत नेतृत्वरूपी जम बसवलेल्या प्रादेशिक पक्षांच्या राजकीय दिग्गजांनी निश्‍चलनीकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचा धुरळा उडवत ते देशाचे प्रधानसेवक नव्हे तर खलनायक असल्याचा अपप्रचार करण्याची एकही संधी दवडली नाही. पण त्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार यांनी मात्र अजिबात आततायी भूमिका न घेता मोदींच्या देशव्यापी निर्णयाचे समर्थनच केले. त्या वेळीही राजकीय विश्‍लेषकांच्या सामान्य समजुतींना चुकीचे ठरवत नितीशकुमारांनी राजकीय भेदाभेद दूर सारत राष्ट्रहित केंद्रस्थानी ठेवणार्‍या निर्णयाचे स्वागत केले.
खरं तर मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर रालोआशी घरोब्याचे संबंध असलेल्या नितीशकुमारांनी मोदींचा चेहरा अमान्य असल्याची नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यामुळे एकेकाळी घनिष्ठ असलेले हे संबंध एकाएकी कनिष्ठ ठरले आणि राजकीय दुरावा निर्माण झाला. तरीही नितीशकुमारांनी राजकीय मर्यादा सोडून कधीही मोदींवर नाहक टीकास्त्र सोडले नाही. त्यांच्या या नितीशनीतीचा आता पुन्हा एकदा परिचय आला आहे. पाटणा येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेविषयी पत्रकारांनी छेडले असता, नितीशकुमार यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर, माझ्या कुवतीबाहेरची स्वप्ने मी पाहणार नाही. कारण, पंतप्रधानपदी विराजमान होण्याची क्षमता माझ्यात नाही. मी छोटा नेता असून, बिहारच्या जनतेची मी सेवा करणार आहे, असे स्पष्ट करून नितीशकुमारांनी २०१९ साठी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर करून विरोधकांच्या अपेक्षांवर पाणीच फेरले आहे. त्यामुळे महाआघाडी स्थापन करून विरोधकांची नितीशकुमार यांना मोदींविरोधात २०१९ साली रिंगणात उतरविण्याची खेळी आता सपशेल फसली, हे मात्र नक्की.
नितीशकुमार एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी मोदींवर स्तुतिसुमनेही उधळली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण, लोकांनी त्यांच्यामध्ये त्या पदासाठीची क्षमता पाहिली आणि त्यांना पंतप्रधानपदी आरूढ केलं. तेव्हा, ज्या व्यक्तीमधील क्षमता लोक ओळखतील, तीच व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल, असा सूचक इशाराच नितीशकुमारांनी या वेळी दिला. त्यामुळे नितीशकुमारांच्या या नीतीमुळे आगामी राजकारणातले फासे कसे पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
– विजय कुलकर्णी
मुंबई