आई निघून गेली…

0
82

आदरांजली
रिमा लागूसारखी एक प्रतिभासंपन्न कलावंत, ज्यांनी आपल्या अभिनयातून एक चांगली आई साकारली, त्यांच्या निधनाची बातमी हादवून सोडणारी आहे. रिमा लागू यांचा चेहरा त्या व्यक्तिमत्त्वातील होता, ज्या व्यक्तिमत्त्वाने कसदार अभिनयातून जुन्या आणि नव्या पिढीच्या मनात प्रचंड प्रेम आणि आपुलकी निर्माण केली. चांगल्या, सोज्ज्वळ हृदयाचे जे चेहरे आपल्या प्रतिभेनं, कलेनं समाजात किंवा ज्या क्षेत्रात कार्यरत असतात, त्या क्षेत्रात एक चांगली ओळख निर्माण करून समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करतात. असं कार्य, ज्या कार्यामुळे ते या जगातून निघून गेल्यानंतर दीर्घ काळ लोकांच्या लक्षात राहतात, लोकं त्यांना विसरू शकत नाहीत! एक बाब अशीही आहे की, एक सिनेकलावंत समाजासाठी आपल्या अभिनयातून काहीतरी भरीव योगदान देतो, ही गोष्ट कुणाला पटत, रुचत नाही. सिनेमात अभिनय म्हणजे फक्त कमाई करण्यासाठी असतो, असा एक गैरसमजही आहे. पण, तो काही कलाकारांच्या बाबतीत फक्त गैरसमजच आहे. कारण समाजमन निकोप राहावं, दुसर्‍यांना एक निखळ आनंद मिळावा, यासाठीही जिवाचं रान करणारे कलाकार आपल्याकडे आहेत. अभिनय ही एक तपस्या मानून आपलं सर्वस्व पणाला लावणारे जे अनेक कलाकार आहेत, त्यात रिमा लागू होत्या.
१९५८ साली मुंबई येथे जन्मलेल्या रिमा लागू यांना तशी बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. मराठी अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्या त्या कन्या. पुणे ऍक्टिंग स्कूलमधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. त्यांच्या सिनेअभिनयाबद्दलचा आढावा घ्यायचा झाला, तर १९७० च्या शेवटी आणि १९८० च्या सुरुवातीला त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात अभिनय करणे सुरू केले होते. सिंहासन या त्याकाळी नावाजलेल्या सिंहासन चित्रपटातून रिमा लागू यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रिमा लागू यांची खरी ओळख १९८९ साली राजश्री प्रॉडक्शनची रिलीज झालेली सुपरहिट फिल्म ‘मैने प्यार किया’ यातील आईच्या भूमिकेने झाली! सुपरहिट गाणी असलेली ही लव्हस्टोरी खासच चालली होती. रिमा लागू यांची सलमानच्या आईची त्यातली भूमिका कोण विसरू शकेल? तरुण मुलाला समजून घेणारी, प्रसंगी मुलाची मित्र होणारी मॉडर्न आई कशी असावी, याचे एक उदाहरण रिमा लागू यांनी आपल्या अभिनयातून साकारलं होतं. त्यानंतरच्या ‘हम साथ साथ हैं’, ‘हम आपके हैं कौन’, ‘साजन’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी सलमानच्या आईची भूमिका केली आहे. हम आपके है कौन या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहयोगी कलाकार म्हणून त्यांना मानांकन मिळाले होते. रेशमगाठसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
या सर्व भूमिकांपेक्षा एक वेगळी भूमिका त्यांनी निभावली ती ‘वास्तव’ या चित्रपटात. गँगस्टर मुलगा गुन्ह्याच्या कोषात पूर्णपणे अडकल्यानंतर, त्याला या नरकातून मुक्ती देण्यासाठी, त्याला जन्म देणारी आईच त्याच्यावर बंदूक चालवते! ‘वास्तव’मधील रिमा लागू यांची भूमिका आईचीच होती, की ज्यामुळे प्रचंड गल्ला या सिनेमानं तेव्हा जमवला होता. शाहरुख खान, अनुपम खेर, काजोल, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत अभिनय करणार्‍या रिमा लागू यांच्या ‘श्रीमान-श्रीमती’ आणि ‘तू-तू-मैं-मैं’ या मालिकांतील भूमिकाही खूप गाजल्या.
जन्माला जोही येईल, त्याला एके दिवशी मरण येणार, हे नक्की! पण, काही माणसं, चेहरे या जगातून निघून गेल्यावर प्रचंड हानी होते. रिमा लागू त्यातीलच एक होत्या! रिमा लागू यांनी साकारलेल्या आईच्या अनेक भूमिका सिनेरसिक सहजासहजी विसरू शकणार नाहीत.
सर्वात खेदाची बाब अशी की, रिमा लागू यांनी ज्या सलमान खानच्या आईची सात वेळा भूमिका वठविली, त्या आपल्या ‘आई’च्या अंत्यसंस्काराच्या वेळी सलमान उपस्थित राहिला नाही. हिंदी सिनेमासृष्टीला संस्कार शिकवणारी आई काळाच्या पडद्याआड निघून जरी गेली, तरी तिने आपल्या अभिनयानं असंख्य सिनेरसिकांच्या हृदयात जे जिव्हाळ्याचं, आपुलकीचं स्थान निर्माण केलं ते अढळ आहे…!
– दीपक वानखेडे
९७६६४८६५४२