रिमा लागू : एका अभ्यस्तपणाचं हरवणं…

0
252

आठवणी
••वास्तव’ चित्रपटाचा प्रीमियर शो नागपुरात होता. सर्व कास्ट उपस्थित होती प्रीमियरला संजय दत्तसकट. प्रयोगाची व प्रीमियरची वेळ एकच होती. खरे तर निर्मात्यांचे संजय दत्तपासून, या प्रीमियरला म्हणून रिमाच्या मागे लागणे होते. प्रयोग काही काळ पुढे ढकलता आला असता रिमाला. पण, स्वत:च्या शब्दांशी बांधिलकी पाळणारी ही व्यक्ती असल्यामुळे त्या दिवशी प्रीमियरला न जाता तिने नियोजित वेळी प्रयोग सुरू करणे निवडले! ‘कमिटमेंट फर्स्ट’ हा अनुभव त्या वेळी प्रत्ययाला आला.
••‘‘रिमाताई, एका दिवाळी अंकासाठी तुमची मुलाखत हवी आहे.’’ त्यावर टेलिफोनिक मुलाखतीसाठी नकार देऊन प्रत्यक्ष भेटून बोलू या, म्हणून मुंबईत आल्यावर भेटा, असे भरघोस आमंत्रण देऊन ते संभाषण तिथेच आटोपतं झालं. आता ऑगस्टमध्ये त्यांची भेट घ्यायची, अशी मनाशी खूणगाठ बांधून मी निश्‍चिंत झाले. पण, माझ्यापेक्षाही निश्‍चिंत असा क्षण रिमाला सापडून ती कायमची एक्झिट घेईल, अशी अजीबात कल्पना नव्हती.
‘आईशपथ’ चित्रपटाच्या वेळी रिमाचे आतून-बाहेरून व्यक्तिमत्त्व अभ्यासता आले. ‘झाले मोकळे आभाळ’च्या वेळी तब्बल चार-पाच दिवस एकत्र राहणं, बोलणं, बसणं, खाणं असे सगळे उपक्रम राबविले गेले. घरचं माणूस असा एक फिल तेव्हा आला होता. त्या दरम्यान नागपूर दूरदर्शनसाठी एक मुलाखत घ्यायची होती. त्यात अनवधानानं ‘‘तुमची सर्वोत्तम भूमिका कोणती आतापर्यंतची?’’ हा प्रश्‍न विचारला गेला. तेव्हा- ‘‘मला अजून खूप काम करायचं आहे, त्यामुळे सर्वोत्कृष्ट भूमिका कोणती ते आताच कसं सांगू मी?’’ असा प्रतिप्रश्‍न मला करून तेव्हा मला त्यांनी गप्प बसवलं. मलादेखील थोडं खजील व्हायला झालं. पण कोण, केव्हा, कशी एक्झिट घेईल, हे कुणालाही सांगता येणार नाही. एक ‘अभ्यस्त अभिनेत्री’ अशी रिमाची ओळख होती. रिमाच्या संदर्भात भूतकाळ वापरावा लागेल, असं चुकूनही मनात आलं नाही. विनोद खन्नाच्या निधनाची खोटी बातमी लोकांनी पसरवली होती तशीच ही असावी, असे काही काळ वाटून गेले. पण, बातमी खरी होती.
‘आईशपथ’च्या वेळी रिमाला, कथा वाचून मुख्य भूमिका आम्ही ऑफर केली, तेव्हा खूप खुशीत होती रिमा. सूरकरांच्या मनात तेव्हा रिमा फारशी ठसली नव्हती त्या भूमिकेसाठी, पण रिमाचा उत्साह त्यांच्या विरोधाला मोडता घालता झाला. ‘तांदुळा- एक मुखवटा’च्या वेळीही रिमाची त्या भूमिकेसंदर्भातील ओढ आमच्यापर्यंत पोहोचली होती.
संस्कृतिकलादर्पणच्या २०१५ सालच्या सोहळ्यात ‘गोष्ट एका राणीची’ला उत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार रिमाताईंच्या हातूनच मिळाला. स्टेजवर तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांनी चौकशी केलीच- ‘माधुरीताई, नवीन काय चाललंय्’’ याची. मिळून एखादा प्रोजेक्ट करण्याचं त्यांनी हळूच सूचितही केलं होतं आणि आमच्या मनातही त्यांना घेऊन कथानक आकाराला आलं होतं.
मॉरिशसला २००६ साली अजय सरपोतदारांनी महामंडळातर्फे एक चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. त्याला एका वृत्तपत्रातर्फे प्रतिनिधी म्हणून मी हजेरी लावली होती. रिमा व मी त्या वेळीही एकत्रच होतो. रिमाचे त्या वेळीही आपुलकीचे सहकार्य मिळाले. त्या वेळी लागू आडनाव न लावण्याच्या संदर्भात रिमाचा कटाक्ष होता. नुसतं रिमा लिहा म्हणून आग्रह असायचा तिचा. नंतर, तो विरोध हळूहळू मावळला व लागू आडनाव पुन्हा रिमाच्या नावापुढे रूढ झाले.
तब्बल चार दशकांची रुपेरी कारकीर्द रिमाने पार केली होती. आणखी कित्येक वर्षे आरामात चालू राहिली असती ही वाटचाल. पण, नियतीने ठरवले असते आपल्या मनाशी काहीतरी व आपली सर्व गणितं ती चुकीची ठरवत असते. एखादा कलावंत, कलावंत म्हणून थोर असतो तेव्हाच तो माणूस म्हणून थोर आहे की नाही हे जेव्हा सिद्ध होते, तेव्हा तो खर्‍या अर्थाने थोर ठरतो. या संदर्भातील एक उदाहरण म्हणजे ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाचे. आम्ही पाच प्रयोग आयोजित केले होते. त्याच वेळी ‘वास्तव’ चित्रपटाचा प्रीमियर शो नागपुरात होता. सर्व कास्ट उपस्थित होती प्रीमियरला संजय दत्तसकट. प्रयोगाची व प्रीमियरची वेळ एकच होती. खरे तर निर्मात्यांचे संजय दत्तपासून, या प्रीमियरला म्हणून रिमाच्या मागे लागणे होते. प्रयोग काही काळ पुढे ढकलता आला असता रिमाला. पण, स्वत:च्या शब्दांशी बांधिलकी पाळणारी ही व्यक्ती असल्यामुळे त्या दिवशी प्रीमियरला न जाता तिने नियोजित वेळी प्रयोग सुरू करणे निवडले! ‘कमिटमेंट फर्स्ट’ हा अनुभव त्या वेळी प्रत्ययाला आला.
चंद्रपूरला एक प्रयोग होता शेवटचा. पण, धुंवाधार अकाली पावसामुळे थिएटर गुडघाभर पाण्यात बुडालेले, सर्व पाणी बाहेर काढून जे काही बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक आले होते त्यांच्यासमोर प्रयोग झाला, नेहमी होतो तसा. पण, निसर्गाच्या प्रतिकूलतेपुढे कुणाचे काय चालणार? त्यांची हळहळ आम्हाला तीव्रतेने जाणवत होती. प्रा. महेश एलकुंचवारांच्या भेटीसाठी एखाद्या नवशिक्या रंगकर्मीला वाटावी अशी हुरहुर व नवथरता रिमाच्या आविर्भावात त्या वेळी प्रकर्षाने जाणवली. एखाद्याचे मोठेपण स्वत:विषयीचे कमीपण (नसलेले) अधोरेखित करून दर्शविण्याची रिमाची ही पद्धत मला खूप भावून गेली.
काहींना रिमा शिष्ट, आढ्यताखोरही वाटत असावी. तसा काहीसा तिचा ऍटिट्यूड क्वचितदा वाटतो. ‘आईशपथ’च्या शूटिंगदरम्यान मला अभिप्रेत असलेली प्रौढ नायिका आपण दाखवू शकतोय् ना, अशी शंका कैकदा रिमा, माझ्यासमोर बोलून दाखवीत असे. मला त्या वेळी काही उत्तरही सुचत नसे. कलाकार म्हणून असणारी नम्रता तुम्हाला उंच उंच नेत असते. असा माणूसपणाचा व कलावंताचा समसमान मिलाप रिमामध्ये होता. सकस वाचनाचे प्रतिबिंब रिमाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये दिसून येते. एक अभ्यस्त, सुजाण, व्यासंगी अभिनेती म्हणून रिमाचे नाव सतत रसिकांच्या स्मरणात राहील. रिमाविषयी प्रवादही होते काही. ड्रिंक्स घेणे, तंबाखू सेवन करणे या संदर्भात वावड्या उठत, काहीअंशी ते खरेही होते. खर्जातील आवाजासाठी सिगरेट, तंबाखू कामी येते असे समज आहेत. रिमाचा आवाज खर्जातला होता. काहीसा कोता होता. परंतु, हीदेखील तिची एक स्टाईल झाली होती. वेगळेपण असावे लागते काहीतरी कलाकारात, ते हे वेगळेपण होते.
विनोद खन्नाच्या संदर्भात जसे अफवा असल्याचे सिद्ध झाले होते, तसे रिमाच्या संदर्भात व्हायला हवे होते. पण, इच्छाशक्ती पणाला लावायला काहीसा उशीर
झाला होता. या द्वंद्वात काळ वरचढ ठरला होता. पुन्हा एकदा मनुष्याची हतबलताच तो अधोरेखित करून गेला होता…
– माधुरी अशिरगडे
९८२३५५५३९८