राममंदिरासाठी मुस्लिम आमदाराचे १५ कोटी!

0
46

वाचकपत्रे
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार येताच, सुधारणावादी मुस्लिम समुदायात एकदम बदल जाणवू लागला आहे. पहिली घटना म्हणजे ७०० मुस्लिमांनी, त्यांना संघात प्रवेश देण्याची विनंती केली; तर दुसर्‍या घटनेत राममंदिरासाठी समाजवादी पक्षाचे मुस्लिम आमदार बुक्कल नवाब यांनी १५ कोटी रुपये देण्याची ग्वाही दिली आहे. या दोन्ही घटना तथाकथित डाव्या विचारसरणीच्या कावळ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणार्‍या आहेत. या देशात कधीही शांतता राहू नये, जाती-धर्मातील तेढ वाढत राहावी, यासाठीच या डाव्या विचारवंतांनी आपल्या लेखण्या आतापर्यंत झिजविल्या आहेत. एक दिवस येईल, जेव्हा याच देशातील मुस्लिम समुदाय या कथित डाव्या विचारसरणीच्या आणि छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांची गाढवावरून धिंड काढतील! या दोन घटना त्यांच्यासाठी धोक्याचा संदेश देणार्‍या आहेत. आ. बुक्कल नवाब यांचे अभिनंदन!
विलास देशपांडे
नागपूर

उद्धव ठाकरे यांचे वरातीमागून घोडे!
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नुकतेच अकोला जिल्ह्यात येऊन गेले. त्यांना तेथे एक साक्षात्कार झाला. तो म्हणजे- जलयुक्त शिवार कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा! ही योजना गेली दोन वर्षे सुरू आहे. किती जलयुक्त शिवार प्रत्यक्षात तयार झाले, त्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात किती पाणी साठले, याची आकडेवारी शासनाने दिली. शिवसेनाही शासनाचे एक अंग आहे. तेव्हा एकाही मंत्री, आमदाराने ही आकडेवारी खोटी आहे, असे म्हटले नाही. आता उद्धव ठाकरे बोंबा मारत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक काम करावे. ठाकरे यांना संपूर्ण राज्यभर जलयुक्त कामांची पाहणी करण्यासाठी फिरवावे. तेव्हाच उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती कळून येईल! स्वत: शिवसैनिकांच्या मदतीने एक जलयुक्त शिवार बांधण्यात आला आहे. केवळ भाजपाची बदनामी, हा एकसूत्री कार्यक्रम शिवसेनेचा दिसतो. जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.
विकास पाटील
अकोला

अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आपल्या नातेवाईकाला कंत्राट देणे, त्याने बोगस बिले सादर करणे आणि केजरीवाल यांनी ती बिले मंजूर करणे यासारखे गंभीर आरोप केजरीवालांवर आमदार कपिल मिश्रा यांनी लावले. विदेशी दौर्‍यांचा खर्च देण्याच्या मागणीसाठी त्यांनी पाच दिवस उपोषणही केले, तरीही केजरीवाल गप्प बसले आहेत. एकेकाळी दुसर्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे केजरीवाल स्वत:वरील आरोपामुळे इतके घाबरले? याचा अर्थ, कपिल मिश्रा यांच्या आरोपात तथ्य आहे. जनतेलाही आता केजरीवालांचा खरा चेहरा दिसून आला आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका आणि एका पोटनिवडणुकीत आपचा जो दारुण पराभव दिल्लीकरांनी केला, त्यापासून तरी केजरीवालांनी धडा घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे व सर्व आरोपांना सामोरे गेले पाहिजे.
अविनाश गोंधळे
नागपूर

पावसाळ्याचे नियोजन आवश्यक
यंदा मान्सून वेळेवर येण्याचे भाकीत सर्वच हवामान केंद्रांनी वर्तविले आहे. याची नोंद घेत, शासनाच्या सर्व यंत्रणांनी आतापासूनच पावसाळ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्ती ओढविल्यास त्याचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्या पाहिजेत. जलयुक्त शिवाराची कामे तातडीने पूर्ण केली पाहिजेत.
श्रावण भेंडे
नागपूर

नितीशकुमार मनातून बोलले…
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, आपण आगामी २०१९ च्या निवडणुकीत मोदी विरोधात पंतप्रधानपदाचा दावेदार नाही, अशी प्रांजळ कबुली दिली आहे. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत आणि मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे त्यांनी जाहीर करून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. त्यांनी हेही सांगितले की, मोदी हे पंतप्रधान होतील, असे कुणाला तरी वाटले होते का? पण, ते आपल्या कर्तृत्वाने पंतप्रधान झाले. आमचा पक्ष एक छोटा पक्ष आहे. मी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत जनतेची सेवा केली आहे व बिहारातील जनतेने आम्हाला बहुमत दिले आहे. तेव्हा मी बिहारचीच सेवा करीत राहणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. यावरून नितीशकुमार यांची प्रगल्भता लक्षात येते.
अरविंद देशमुख
अमरावती