सोडणेच ‘धरायला’ हवे!

0
91

शतश्‍लोकी
यक्तिंचिन्नामरूपात्मकमिदमसदेवोदितं भाति भूमौ|
येनानेक प्रकारैर्व्यहरति जगद्येन तेनेश्वरेण|
तद्वत्प्रच्छादनीमं निभृतरशनया यद्वदेष द्विनिव्हसस्तेन त्यक्तेन भोज्यं सुखमनतिशयं मा गृधोऽन्यद्धजाद्यम् ॥
या जगातील असत रूप सकल नामरूपात्मक पदार्थ ज्याच्यामुळे प्रतीत होतात, त्या ईश्‍वराद्वारे हे सगळे जग; दोरीचे यथार्थज्ञान झाल्याने साप झाकाळून जातो त्याप्रमाणे झाकून टाकायला हवे. (अशा या जगाचा अशा प्रकारे) त्यागानेच आनंद घ्यायला हवा. इतरांच्या धन इ.ची कधीही इच्छा करू नये.
जगात सुखाने, समाधानाने आनंदाने कशा रीतीने जगायचे याचे सुंदर विवेचन येथे पू. आचार्यश्री सादर करीत आहेत. मुळात दु:ख का होते, हेच जणू आचार्यश्री सांगत आहेत. या जगाला सत्य मानणे हेच दु:खाचे मूळ आहे. बरे, ते खरेच दु:खदायी असते तर उपायही त्यावर करता आले असते. पण, पंचाईत अशी आहे की, त्याची दु:खदायकताही तितकीच भासमान आहे जितके ते स्वत: भासमान आहे. नव्हे, त्या भासालाच सत्य मानत बसल्याने सगळे दु:ख आहे. पू. आचार्यश्री पुनश्‍च सर्परज्जू न्यायाचाच विचार मांडत आहेत. आध्यात्मिक शास्त्राचे हेच वैशिष्ट्य आहे. येथे तेच ते वर्णन वारंवार येते. साप आणि दोरीचेच उदाहरण वारंवार का? असा प्रश्‍न कदाचित या शास्त्राच्या नवीन वाचकाला पडू शकतो. पण, याचे कारण हेच असते की, एकतर हे दृष्टान्त अत्यंत चपखल असतात. त्यामुळे तेच वापरणे सुयोग्य ठरते. अन्य दृष्टान्त वापरायला हरकत नसते, पण त्यात सगळ्या पैलूंना जर स्पर्श झाला नाही, तर अनेकदा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळी उदाहरणे देत मनोरंजन साधणे हे येथील उद्दिष्टच नाही. विषय मनी पक्का ठसविण्यापुरताच दृष्टान्तांचा उपयोग असल्याने वारंवार तोच दृष्टान्त अधिक उपयोगी ठरतो. तसेच वारंवार तेच ते सांगितल्याने घडणारी पुनरुक्ती विषयाला दृढ करीत असते म्हणून तेच दृष्टान्त आणि त्यांचे तेच ते कथनीयही वेगवेगळ्या रूपात पुन:पुन्हा येत राहते. येथेही अशीच पुनरुक्ती घडत आहे.
साप आणि दोरीच्या दृष्टान्ताच्या आधारे येथे आचार्यश्री सांगत आहेत की, एकदा का दोरीचे ज्ञान झाले की, मग साप झाकला जातो. येथे झाकला जाण्याचा अर्थ न कळणे असा आहे. जोवर दोरीचे ज्ञान नव्हते तोवर ती कळत नव्हती. आता तिचे ज्ञान झाल्यावर साप कळत नाही. तो जाणवतच नाही.
हे झाकले असणे, न कळणे मोठे मजेदार आहे. सापाची भीती त्याच्या असण्यात नाही, तर दिसण्यात आहे. एखादा माणूस कामानिमित्त जिन्यावरून वेगात खाली येतो. पटकन ते काम करतो आणि लगेच वळतो. तर त्याला मध्येच एका पायरीवर एक साप दिसतो. तो प्रचंड ओरडतो. याच्या भीतीचे कारण दुहेरी असते. एक तर साप दिसला हे एक कारण आणि मगाशी वेगात खाली आला तेव्हाही तो तेथेच होता आपण त्याच्यावरूनच आलो ही जाणीव, हे दुसरे कारण. हे दुसरे कारण त्याला अधिक घाबरवते. पण गंमत पाहा, तो साप मगाशीही होता, पण त्या वेळी त्याची भीती वाटलीच नाही. कारण तो दिसलाच नव्हता. आता दिसला. मग पूर्वीचीही भीती वाटली. वाचलो इ. वाटले. याचाच अर्थ प्रत्यक्ष सापाचीही भीती ही असण्याची नाही तर दिसण्याचीच आहे. येथे तर दोरीवरचा साप खोटाच आहे. पण तो खोटा असला तरी ‘दिसतो’ आणि दिसला की भीती आहेच, दु:ख आहेच.
पू. आचार्यश्री जेव्हा त्या सापाच्या झाकलेपणाचा विचार मांडत आहेत त्या वेळी त्याचे न दिसणे अपेक्षित आहे. एकदा दिसणे नाही म्हटले की ना भय, ना दु:ख. हे दिसणे तेव्हाच झाकले जाईल ज्या वेळी आजवर झाकलेल्या दोरीची जाणीव होईल. दोरी कळली की साप आपोआपच कळेनासा होतो. तद्वतच एकदा ईश्‍वरी अधिष्ठानाचे ज्ञान झाले की जगताचे भासमानत्व आपोआपच विरून जाते.
एकदा का असे ‘साप’रूपी जगाचे दिसणे संपले की, दु:खाचे कारण काय? साप खरा वाटत होता म्हणून दु:ख होते. तो खरा नाही कळला की शांतीच शांती. तीच रचना जगाची आहे. ते सत्य वाटते तोवरच समस्या आहे. हे जग सत्य वाटते तोवरच त्याची सापाप्रमाणे भीती आहे किंवा शिंपल्यावर दिसणार्‍या चांदीप्रमाणे आसक्ती. ही आसक्ती संपली की चांदी दिसत तर राहील, पण न मिळाल्याचे दु:ख नसेल. यालाच त्या चांदीचा त्याग म्हणतात. आचार्यश्री जगाचा असा त्यागमय आनंद घ्यायला सांगत आहेत. हे सगळे भासमान असल्याने त्याच्या त्यागातच आनंद आहे, हे सांगत आहेत.
अंतिम चरण ईशावास्योपनिषदाची आठवण करून देणारे आहे. वेगळ्या शब्दांत पुनरपि एकदा आचार्यश्री हेच अधोरेखित करीत आहेत की, शतश्लोकी हा ग्रंथ जरी स्वतंत्र असला, तरी प्रतिपाद्य विषय उपनिषदांचाच आहे.
– प्रा. स्वानंद गजानन पुंड