कसे कसे शिक्षक

0
94

वेध
गोष्ट पहिली : घरासमोरच्या नगर परिषद प्राथमिक शाळेतील एक शिक्षक सकाळी सकाळी घरी आला. त्यानेच ओळख करून दिली, मी या समोरच्याच शाळेत शिक्षक आहे, तुम्ही तर मला ओळखताच. असे तोच म्हणाला. अवांतर गोष्टी केल्या, तुम्हा पत्रकारांचे संबंध सगळीकडे असतात, असे म्हणून प्रस्तावना केली. मोठीच अडचण झाली आहे, असे सांगून त्याने बदली झाली असल्याचे सांगितले. सध्याच्या सात नंबर शाळेतून बारा नंबर शाळेत बदली केली आहे. मीही गंभीरपणे विचारले, किती दूर आहे ही शाळा? त्यानेही दोनशे किलोमीटरवर फेकल्याच्या आविर्भावात सांगितले, दोनअडीच किलोमीटर असेल. मी त्याच शैलीत म्हटले, अरे बापरे, इतक्या दूर? त्यावर तर हा शिक्षक अधिकच खुलून म्हणाला, पाहा ना आता !
या नगर परिषद प्राथमिक शाळेतील या शिक्षकासोबत मग परिषदेतील राजकारणावर चर्चा करावी लागली. मी राजकारणाचाच ‘बळी’ ठरलो आहे, वगैरे तो बोलत होता आणि मी ऐकत होतो. नगर परिषदेतील घाणेरड्या राजकारणामुळे एका सच्छील आणि प्रामाणिक शिक्षकाला ‘दोन’ किलोमीटरवरच्या शाळेत ‘फेकणे’ किती भयंकर होते. याबाबत मी नगर परिषद अध्यक्षांशी बोलावे, अशी त्या ‘अन्यायग्रस्त’ शिक्षकाची अपेक्षा होती, आणि ती मी नाकारू नाही शकलो, त्याच्यासमोर…
गोष्ट दुसरी : एकदा यवतमाळहून अमरावतीला निघालो होतो. सकाळी साडेसातच्या बसमध्ये बसलो. साडीतल्या एक मध्यमवयीन बाई घाईघाईने चढल्या आणि माझ्या बाजूला बसल्या. फक्त डोळेच दिसत होते, तेही अर्धवट. बाकी सारा चेहरा पक्का, एका मोठ्या रुमालात व्यवस्थित आणि आक्रसून बांधला होता. इतका की, एखादा बुरखा परवडेल! एकूणच अवतारावरून त्या ‘बाई’ म्हणजे शिक्षक असाव्या, असे वाटत होते. बस सुटल्यावर पंधरा-वीस मिनिटांनी माझ्यातला पत्रकार जागला. बाईंना ‘टीचर’ आहात का असे विचारले, हो म्हणाल्या. जिल्हा परिषद शाळेत असल्याचे सांगितले. नेरजवळ मुख्य रस्त्यावरच्या एका गावातील प्राथमिक शाळेत आहे, असे सांगितले. इकडचेतिकडचे झाल्यावर सहजच एक प्रश्‍न विचारला, शाळेची प्रार्थना केव्हा असते? ते कळले नसावे असे वाटले म्हणून पुन्हा विचारले, ‘प्रेयर’ केव्हा असते? त्यांनीही सहजच सांगितले, साडेसात वाजता. मी घड्याळात पाहिले, पावणेआठ झाले होते आणि शाळेपासून या बाई चक्क एक तासाच्या अंतरावर होत्या. असेच असते अनेकांचे ‘अपडाऊन!’

काय काय उद्योग…
कामचुकारपणा सर्वच क्षेत्रात बोकाळलेला आहे. खाजगी क्षेत्रात व्यवस्थापन दक्ष आणि कडक असेल तरच नाही जमत. पण, सरकारी किंवा सरकारीसारखे व्यवस्थापन असेल तर कोणीच विचारणारे नाही म्हणून कामचुकारपणाला प्रोत्साहनच मिळते. पण, शिक्षकी पेशात स्वत:चे कर्तव्य, कामावर निष्ठा, नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी याची मुळीच जाणीव नसणे, ही चिंतेची बाब आहे. ‘सत्यशोधन’ क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतलेल्या यवतमाळ नगर परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने तर ‘आधुनिक वेठबिगारी’चा जनक होण्याचा मान मिळवला आहे. या भोंदू शिक्षकाने तीस-चाळीस हजार रुपये पगार घेऊन तीन-चार हजार रुपयांवर एका महिला शिक्षकाला वेठबिगार म्हणून काम देण्याची आऊटसोर्सिंग केल्याचे ताजे उदाहरण आहे. निलंबित होऊन घरी बसला आहे आता. कलंकच शिक्षकी पेशाला, दुसरे काय?
सध्या कोचिंग क्लासेस, म्हणजेच शिकवणी वर्गांचे पेव गावोगावी फुटले आहे. पालकांनाही जितक्या शिकवण्या जास्त तेवढे मुलांचे कौतुक वाटायला लागले आहे. यवतमाळातील असाच एक शिकवणी वर्गवाला मास्तर आपल्याच एका शाळकरी विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला. मास्तर चाळीशी ओलांडलेला, तर मुलगी नवव्या वर्गातली. तिच्याशी लगट करणे, वाह्यात बोलणे सुरू झाले. पुढे तर मोबाईलवरून मेसेज पाठवणे, व्हॉटस् ऍप या समाजमाध्यमाचा वैयक्तिक प्रेमालापासाठी वापर करणे सुरू झाले. (शाळकरी मुलीला मोबाईल घेऊन देणार्‍या मूर्ख मायबापांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!) हे सारे मुलीच्या मनाविरुद्ध सुरू असल्याने या मास्तरचे शंभर अपराध भरले आणि तो अक्षरश: पोलिस कोठडीत डांबला गेला. जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा या तर अनेकदा निर्जन किंवा समाजाच्या नजरेआड असतात. तिथे तर मुलींवर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असा प्रसंग असतो. ‘अशा’ घटना अधूनमधून उजेडातही येतात. शहरी भागातही आता ‘जोखीम’ पत्करून हे ‘उद्योग’ वाढले आहेत. यवतमाळातील एका पब्लिक स्कूलचे दोन हलकट शिक्षक अनेक महिन्यांपासून तुरुंगाची हवा खात आहेत, अशाच बलिका शोषणासाठी.
मध्यंतरी एका जिल्हा परिषद शाळेत अर्धे शिक्षक पूर्वसूचनेशिवाय ‘गैरहजर’ असल्याचे आढळले. अधिक चौकशी केली असता या शाळेत ‘अर्धे दिवस, अर्धे शिक्षक’ अशीच पद्धत असल्याचे उघडकीस आले. अर्ध्यांनी अर्धे दिवस पूर्ण शाळा सांभाळायचे गणित. शिक्षणधिकार्‍यापासून हेडमास्तर, मास्तर आणि प्युनपर्यंत सारेच ‘मॅनेज’, ना हाक, ना बोंब! ग्रामीण भागातील शाळांमधल्या शिक्षकांचा खिचडीतील घोळ, सावकारी, विमा एजन्सी, एवढेच नव्हे, तर काही मटका केंद्रसुद्धा चालवीत असल्याची बोंब असते. बदली नको म्हणून यवतमाळ शहराजवळच्या एका जिल्हा परिषद शाळेतील १९ पैकी १६ शिक्षकांनी चक्क अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली आहेत. आता बोला!
– अनिरुद्ध पांडे
९८८१७१७८२९