पर्यायी राजकीय पक्षाची स्थिती

0
91

न मम…
••तन, मन, धनाने कार्य करायचे आणि शेवटी ‘राष्ट्राय स्वाहा| न मम|’ म्हणत अनासक्तीने वेगळे व्हायचे, हे सांगणे सोपे आहे, करणे तितकेच अवघड. एक-दोन नाही, लाखो संघस्वयंसेवकांनी गेल्या ९० वर्षांच्या काळात हे करून दाखविले आहे. आज जे पर्यायी राजकीय पक्ष काढण्याचा विचार करीत आहेत, त्यांना ही साधना झेपणार आहे का? त्यांच्यात एवढा संयम आहे का? प्रत्येकाला ‘चट् मंगनी, पट् ब्याह’ हवे आहे.
••दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप)च्या शोचनीय पराभवावर, योगेंद्र यादव यांची बोलकी प्रतिक्रिया आली. ते म्हणाले- ‘‘एमसीडी चुनाव में आप की करारी हार, तथा इस हार का ठिकरा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सपर फोडना, इससे बाकी की सारी संभावनाएँ भी समाप्त होती नजर आ रही हैं|’’ योगेंद्र यादव आपचे एक संस्थापक होते. पक्षाला वैचारिक अधिष्ठान देणारे संयमित नेते म्हणून त्यांची ओळख आहे. योगेंद्र यांनी ‘ंसंभावनाएँ’ हा शब्द वापरला. संभावना म्हणजे शक्यता. अशा कुठल्या शक्यता किंवा आशा या पक्षाकडून होत्या? या देशात भारतीय जनता पार्टीला (भाजपा) पर्यायी राजकीय पक्ष उभा करण्याचा प्रयत्न आपच्या माध्यमातून होत होता. ती शक्यता संपली, अशी यादव यांची खंत आहे.
लोकशाहीत एकच प्रबळ राजकीय पक्ष असणे, श्रेयस्कर नसते. दोन तुल्यबळ पक्ष असणे, लोकशाहीच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक मानले आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात कॉंग्रेस हाच एकमेव सबळ पक्ष होता. त्यामुळे त्या काळी, गैरकॉंग्रेसवादाच्या आधारावर विरोधातील विविध पक्षांना एकत्र आणण्याचे व त्यांची एक शक्ती उभी करण्याचे सफल प्रयत्न थोर समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी केले. कालांतराने, गैरकॉंग्रेसी पक्षांमधील भाजपा वेगाने शक्तिमान होत गेला. आज भाजपा हा देशातील सर्वात मोठा व सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे. भाजपाला टक्कर देईल, अशी ताकद, एकेकाळी शक्तिशाली असलेल्या कॉंग्रेसजवळही नाही, याचे प्रत्यंतर लोकांना अनेकवेळा आलेले आहे आणि त्याची सध्याची वाटचाल बघता, भविष्यातही हा पक्ष राजकीय शक्ती अर्जित करू शकेल असे वाटत नाही. त्यामुळे गैरभाजपा व गैरकॉंग्रेस पक्षांना एका नव्या राजकीय आघाडीची गरज भासू लागली व ती गरज आपने पूर्ण करावी, असे प्रयत्न सुरू झाले.
सर्वसामान्य लोकांना प्रश्‍न पडतो की, राजकीय पक्ष का स्थापन होतात? याचे कारण, प्रत्येकाला आपल्या कल्पनेप्रमाणे भारताचा विकास करायचा आहे. भारतीयांचे हित व्हावे, असे प्रत्येकालाच वाटते. अगदी कार्ल मार्क्सलादेखील वाटत होते. परंतु, हे हित किंवा कल्याण आमच्या संकल्पनेप्रमाणे व्हावे, असा त्यांचा आग्रह असतो. त्यात काहीही वावगे नाही. हा जो विकास किंवा भारतीयांचे कल्याण करायचे आहे, त्यासाठी साधन म्हणून राजकीय पक्ष स्थापन होतात. कारण राजकीय सत्तेच्या मार्फतच देशाचा विकास होऊ शकतो, यावर लोकांचा ठाम विश्‍वास आहे. म्हणून आपल्याला देशात शेकड्याने राजकीय पक्ष किंवा संघटना स्थापन झालेल्या दिसून येतात.
परंतु, भारताचा विकास करायचा म्हणजे प्रथम भारत म्हणजे काय, ही संकल्पना स्पष्ट असली पाहिजे. भारताची संकल्पना (आयडिया ऑफ इंडिया) काय आहे, तिच्या आधारावर राजकीय पक्षाची उभारणी तसेच धोरणे ठरत असतात. भारताची संकल्पना मांडताना सामान्यत: दोन विचारप्रवाह दिसतात. एक कम्युनिस्ट व दुसरा हिंदुत्ववादी. त्या आधारावर प्रत्येक पक्ष आपापली धोरणे ठरवीत असतात. राजकीय पक्ष स्थापन करणे, कालांतराने सत्ता प्राप्त करणे आणि मग सत्तेच्या आधारावर आपल्या संकल्पनेप्रमाणे जसा जमेल तसा भारताचा विकास करणे, असा हा विकासक्रम असतो. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (रा. स्व. संघ) विचार वेगळा आहे. राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच या देशाचा विकास किंवा कल्याण होईल, असे संघ मानीत नाही. त्यामुळे या राजकीय पक्षांना संघाचे सम्यक् आकलन होत नाही. राजकीय सत्ता हेच एकमेव ध्येय नसणे आणि तरीही देशाच्या विकासासाठी धडपड करणे, या कल्पनेचा ते विचारही करू शकत नाही आणि म्हणून या मंडळींची ठाम धारणा आहे की, संघ राजकारणात नाही असे म्हणत असला, तरी संघाचा छुपा अजेंडा आहे. अशा या जगावेगळ्या संघविचारांनी भाजपा प्रेरित आहे. त्याला पर्यायी राजकीय पक्ष उभा करणे वाटते तितके सोपे नाही. कारण संघाची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. परंतु, या मंडळींना वाटते इतर राजकीय पक्षांसारखा भाजपा आहे.
संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी ज्या पद्धतीने भारतीय समाजाच्या दुर्दशेचे निदान केले, ते तर विलक्षण आहे. भारतीय म्हणजेच हिंदू समाज सर्वार्थाने संपन्न, समृद्ध, बलशाली, पराक्रमी, उदारमतवादी, कुशाग्र बुद्धिवादी असा होता. कालांतराने त्याच्यात दोष शिरले आणि त्याची अधोगती सुरू झाली. काळाच्या ओघात कितीतरी संस्कृती नष्ट झाल्यात, परंतु ही संस्कृती आजही टिकून आहे. हे याचे वैशिष्ट्य आहे. हे दोष काढले तर हा समाज पुन्हा एकदा आपल्या भूतकाळातील सर्व गुणवैशिष्ट्यांनी तळपू लागेल, असा विश्‍वास डॉ. हेडगेवारांना असला पाहिजे. त्यासाठी त्यांनी संघ नावाची संघटना काढली. संघ हे औषध आहे. याची स्पष्ट कल्पना डॉ. हेडगेवारांपासून आजच्या सर्व संघ अधिकार्‍यांना आहे. रोग्याला औषध देणे हे तात्पुरते असले पाहिजे. लवकरात लवकर रोग्याची स्वयंभू प्रतिकारशक्ती सक्रिय व्हावी आणि त्याला औषधोपचाराची आवश्यकताच भासू नये, अशीच कुठल्याही डॉक्टरची धडपड असते. संघाचेही हेच मत आहे. त्यामुळे संघाची आवश्यकता भासू नये, इतका हा समाज लवकरात लवकर दोषमुक्त व्हावा, असे संघाला वाटते. आपले नाव व्हावे, आपल्याला श्रेय मिळावे, सर्व समाज संघाचा स्वयंसेवक व्हावा, असा कुठलाही विचार व कृती संघाला अपेक्षित नाही. त्यामुळे समाजात जिथे कुठे देशहिताचा विचार किंवा कृती असेल, त्या प्रत्येक ठिकाणी संघाने सहकार्य केले आहे. समाज दोषमुक्त होऊन समर्थ व्हावा, हे ध्येय असल्याने संघाला कुणीही अस्पृश्य नाही. हे असले कुणी ऐकलेही नसल्याने, लोकांना त्याचे आकलनच होत नाही. त्यामुळे संघ म्हणजे नेमके काय, याचा थांगपत्ता लागत नाही.
त्यामुळेच संघविचारांनी प्रेरित भाजपाला पर्यायी राजकीय पक्ष उभा करणे सोपे नाही. काही जणांनी संघाची नक्कलही करून पाहिली. पण तेही जमले नाही. तन, मन, धनाने कार्य करायचे आणि शेवटी ‘राष्ट्राय स्वाहा| न मम|’ म्हणत अनासक्तीने वेगळे व्हायचे, हे सांगणे सोपे आहे, करणे तितकेच अवघड. एक-दोन नाही, लाखो संघ स्वयंसेवकांनी गेल्या ९० वर्षांच्या काळात हे करून दाखविले आहे. आज जे पर्यायी राजकीय पक्ष काढण्याचा विचार करीत आहेत, त्यांना ही साधना झेपणार आहे का? त्यांच्यात एवढा संयम आहे का? प्रत्येकाला ‘चट् मंगनी, पट् ब्याह’ हवे आहे.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे कसब महात्मा गांधींमध्ये होते. महात्माजींच्या या पुण्याईचा कॉंग्रेस पक्षाला आता आतापर्यंत फायदा झाला. परंतु, आता या पक्षासमोरही ‘पुढे काय?’ हा प्रश्‍न आहे. इतर पक्षांबाबत तर काही बोलायलाच नको. हे पक्ष एका प्रदेशापुरतेच मर्यादित झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा फार आहेत. अशा स्थितीत, अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष, आशेचे एक किरण होता. प्रारंभी त्याने मिळविलेले यश, लक्षणीय होते. परंतु, लवकरच आप हा पक्ष मातीचे ढेकूळ सिद्ध झाला! आता भारतीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. योगेंद्र यादवादी विचारवंतांची ही खंत आहे. त्यांना आता भाजपाला पर्याय उभा करण्याच्या सर्व शक्यता संपलेल्या दिसत आहेत. राजकारणात पूर्णविराम नसतो. योगेंद्र यादवांच्या आवाक्यात नवा पर्याय देणे नाही, म्हणून नवा पर्याय समोर येणारच नाही, असे नाही. कदाचित कॉंग्रेस पक्ष, राहुलचे नेतृत्व झुगारून, सचिन पायलटसारख्या दुसर्‍या एखाद्या तरुण नेतृत्वात पुन्हा उभा राहू शकतो. थोडक्यात, भारतीय लोकशाहीचा प्रवाह आणखी काही काळतरी, एका बाजूला भक्कम तट, तर दुसर्‍या बाजूला गटा-तटात विभागलेला किनारा, यामधूनच वाहणार असे दिसते.
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८