मृत्यूचे काव्य आणि निसर्ग

0
120

अग्रलेख
मृत्यू ही एक नि:शब्द कविता आहे. आपल्या गूढ मौनातून मृत्यू जे काय बोलत असतो ते अनाहत असते आणि कळले तर ते सुंदरही असते. जन्माइतकाचा तो निसर्गाचा सर्वोत्तम आविष्कार आहे. कुठे थांबायचं हे माणसांना नाही कळत, तेव्हा कुठे थांबवायचं हे मृत्यूला कळत असल्याने माणसांचे आयुष्य रेखीव, नेमकेपणाच्या लावण्याने नटले असते. ‘अगणित लावण्य, तेज पुंजाळले…’ असे माउलींनी एका वेगळ्या अर्थाने म्हटले असेल, मात्र त्याचा श्‍लेषार्थ आविष्कृत करायचा झाला तर हे लावण्य मृत्यूचेच आहे. यात माउलींनी ‘लावण्य’ असा शब्दप्रयोग केलाय्. हा शब्दच मुळात अपौरुषेय आहे. त्याला पार्थिवाचा स्पर्शच झालेला नाही. लावण्य जेव्हा पार्थिवाच्या मर्त्य कोंदणात बसविले जाते तेव्हा ते सौंदर्य होते. ते साध्या डोळ्यांनी तेव्हा पाहता येते. लावण्याचे तेज इतके असते की, चर्मचक्षूंनी अवलोकता येत नाही. पार्थिवाची खोळ पडते तेव्हा मग मोह, लोभ, दंभापासून सारे गुण-अवगुण गळून पडतात आणि मग सुख नावाच्या वेदनेचाही हव्यास संपतो. लावण्य आपल्या मूळ रूपात पुन्हा प्रकट होते. त्याला मृत्यू म्हणायचे असते… त्यातच सृजनाची लखलखती वीज धारण करण्याची क्षमता ठेवणार्‍या जिवाला पार्थिवतेतून मुक्ती मिळते तो मृत्यू अनेकांना हळहळविणारा असतो. कारण अनेक जिवांच्या अमर्त्य आयुष्याला सुखाचा आशीर्वाद देण्याची क्षमता सृजनांमध्ये असते. रिमा लागू नामक अभिनेत्रीत तो होता आणि अनिल दवे नामक एका नेतृत्वातही तो होता. एकाच दिवशी या दोघांच्याही देहमुक्तीने निसर्ग नावाच्या कवीच्या मृत्यू या सर्वोत्तम कवितेचे आणखी एक कडवे साकार झालेले आहे. भौतिक जाणिवांनी पाहिले तर हे दोघेही वेगेवगळ्या प्रांतात कार्यरत असणारे, वेगळेच आविष्करण साधणारे आणि भिन्न जीवितकार्य असणारे होते. मात्र, ते दोघेही सृजन होते. सृजनाने फूलही फुलते आणि त्या फुलांच्या माळाही होतात. जिवांचे जगणे अधिक सुकर करणे, हा त्याच्या मागचा हेतू असतो. अनिल दवे हे राजकीय नेता होते, असे सरळधोपटपणे म्हणता येईल. मात्र, सृजनाचे देणे लाभल्याशिवाय कुठलाच जीव जीवनाचा कुठलाच कोपरा सुगंधी करू शकत नाही. अनिल दवेंनी तो केलेला आहे. तसा तो अभिनेत्री बनून सृजनाचे वहन करत रिमा लागूंनीही केलेला आहे. आपण अशांच्या भौतिक मिळकतींवर त्यांच्या यशस्वी आयुष्याचे अयशस्वी मोजमाप करत असतो. ते किती शिकले, त्यांनी त्यांच्या निवडलेल्या मार्गात काय काय नवे केले, त्यासाठी त्यांना कुठली पदे आणि पुरस्कार मिळाले… असेच आपले मोजमाप असते आणि मग त्यांच्या मरणाचे हे वय नव्हते, असे म्हणत आपण हळहळत असतो. हे हळहळणेही स्वार्थी असते. त्यांच्या सृजनाविष्काराला अधिक संधी मिळाली असती, तर आपली जीवने अधिक संपन्न झाली असती, असा आपला आतला भाव असतो. मात्र अशांचे आयुष्यच मुळात फारच संपृक्त असते. तालेवार गज़लेच्या मक्त्यासारखे सुफळ संपूर्ण आयुष्य ते कमी पल्ल्यात जगून घेत असतात. हे दोघेही साठीच्या घरातच या जगाचा निरोप घेते झालेले. अनिल दवे हे संघाचे प्रचारक होते. पदवीनंतर ते प्रचारक म्हणून बाहेर पडले. त्यातून ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या जवळ गेले. त्यांच्यातल्या कलावंताची शक्ती त्या क्षेत्रात प्रकट होत राहिली. मध्यप्रदेशात नाकर्त्यांचे सरकार उलथवून साकर्त्यांचे सरकार स्थापन करण्यात संघटक म्हणून त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, अशी माणसे कर्तृत्वाचा गर्व करत नाहीत. त्यांचे कर्तृत्व निर्व्याज असते. म्हणून त्याला आविर्भावाचा दर्प- दुर्गंध येत नाही. फुलांचे घोस अंगोपांगी जोजवणारे झाड कुठे त्याचा सोस करते? म्हणून फुले सुगंधी असतात. दवेंच्या पुढाकाराने आलेले शिवराजसिंह चौहान यांचे सरकार दोन दशके झालीत, जनतेच्या मनात रुजले आहे. सुखकर परिवर्तन हे सृजनाचे आणखी एक काम असते आणि दवेंनी ते केले. नंतर कुठलाही सृजन यशापाशी थांबत नाही. यशाचे पालकत्वही मिरवीत नाही. कारण ते जाणते असतात, त्यांना कळत असतं की, यशाचे अनेक पालक असतात. दवे असेच पुढे निघून गेले आणि मग त्यांनी पर्यावरणाच्या क्षेत्राचा लळा घेतला. सुप्तावस्थेत गेलेल्या नर्मदेने त्यांना वेड लावलं आणि त्यांच्या घराचे नावही मोठे निसर्ग काव्य दोन शब्दांत सांगणारे, ‘नदी का घर’ असे होते. नर्मदेची परिक्रमा त्यांनी केली आणि मग आभाळाच्या डोळ्यांनीच बघावी नर्मदा म्हणून स्वत: पायलट होऊन त्यांनी विमानातून नर्मदेची परिक्रमा केली. मृत्यूनंतर याच नर्मदेच्या काठावर आपला देह विसावा, अशी त्यांची इच्छा होती. होशंगाबाद इथल्या बांद्राभान इथे ज्या ठिकाणी नर्मदा महोत्सव होतो, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी नर्मदा शुद्धीकरणाची मोहीम राबवायला सुरुवात केली असतानाच दवेंनी असं नर्मदेसारखंच लुप्त व्हावं, हा निव्वळ योगायोग तरी कसा समजायचा? जे दवेंचे तेच रिमांचे. खरेतर स्त्री ही एक वाहती नदीच असते. अनेक प्रवाह ती स्वीकारते. अनेकांचे जीवन सुपीक करते आणि समुद्रात विलीन होते. दवेंच्या ‘नदी का घर’ नामक घराची कलासक्तता रिमाच्या जगण्यात होती. त्यांचे जगणे हीच कला होती तर दवेंची कला हेच जगणे होते. रिमांनी त्यांच्या आईकडून कलेचा वारसा घेतला. त्यांच्या आईचे नाव मंदाकिनी भडभडे. इथेही मंदाकिनीच्या रूपात नदीचा संदर्भ येतोच. विजयाबाई मेहतांच्या स्कूलमधून उमललेली ही मोठी कलावंत होती. त्यांच्या कलाजाणिवा फार प्रखर असल्याने वेळी त्या कलावंत म्हणून बाईंशीही अनेक विषयांवर वाद करीत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी ‘का?’ हा सवाल केला. अशी माणसे त्यांच्या जगण्याच्या काळात सहजीवकांना खटकतच असतात. निमूटपणे ऐकणारीच सार्‍यांना हवी असतात. रिमांनी कलाक्षेत्रात मान हलविण्याची भूमिका कधीच केली नाही. भूमिका निवडतानाही त्यांनी कायम चिकित्सकपणा दाखविला. ‘पुरुष’मध्ये त्या नाना पाटेकरांसमोर प्रखरपणे उभ्या राहिल्या. अनेक नाटके, चित्रपट आणि मालिका केल्या. मात्र, त्यांना हवे ते साकारण्याची संधी अद्याप मिळालेली नाही, असेच त्यांना सतत वाटत राहिले. आपल्या क्षमतांचा कस लागणारे काही आपल्या कलेच्या क्षेत्रात करता यावे, असेच कुठल्याही अस्सल कलावंताला वाटत असते आणि ते समोर दिसत असताना तो त्याच्याकडे झेपावत सृजनाचे आविष्करण करत राहतो. त्याचे समाधान होत नाही. हेच त्याच्या कलाक्षेत्रातील कर्तृत्वाला नवतेची तहान पुरविणारे ऊर्जास्रोत असते. रिमा लागूंच्या बाबतही हे अगदी चपखल लागू होते. कलावंत व्यवसायिक झाला की, तो बिदागीत अडकतो आणि मग पैशांच्या तुलनेत हवे ते देतो, असे होते. रिमादेखील व्यावसायिक कलावंत होत्या. त्यात यश हे कामांचे सातत्य आणि मिळणारे मानधन हेच असते, असा चुकीचा समज काही कलावंत करतात आणि मग त्यांची प्रतिष्ठाने होतात. रिमांसारखे काही जाणते कलावंत खर्‍या अर्थाने व्यावसायिकता जोपासत असतात. मालिका आणि चित्रपटांच्या गर्दीत त्या हरविल्या नाहीत. नव्या जगाच्या चित्रपटांची मागणी म्हणून ‘ग्लॅमरस आई’चा त्या पहिला चेहराही झाल्या. मात्र, त्यातही त्यांनी त्यांचा वेगळा ठसा उमटविला होता. दवेंचा निसर्ग आणि रिमांचे काव्य आज मृत्यूच्या अनाहत मिठीत विसावले आहे…