हरले तरी चॅम्पियन हैदराबादचे खेळाडूच ः गंभीर

0
131

दुसरा क्वॉलिफायर सामना
मुंबई इंडियन्स
वि. कोलकाता नाईट रायडर्स
बंगळुरू येथे रात्री ८ वाजता
बंगळुरू, १८ मे
आयपीएल-१०च्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने जरी गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादला हरविले, परंतु कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने हैदराबादच्या खेळाडूंची मुक्तकंठाने प्रशंसा केली. हैदराबाद संघाचा सल्लागार व्ही.व्ही.एस. लक्ष्मणसह युवराज सिंग व डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन आहे, असे प्रशंसोद्गार त्याने काढले.
समाधान देणारा विजय, परंतु माझे मन सनरायझर्स हैदराबादसोबत आहे. या पराभवाला समजणे अवघड आहे, परंतु लक्ष्मण, युवराज सिंग व डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन तुम्हीच आहात, असे गौतम गंभीरने ट्वीटमध्ये लिहीले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा विजय संघात चैतन्य निर्माण करणारा आहे, असेही गंभीर अन्य एका ट्वीटमध्ये म्हणाला.
नॅथन कुल्टर नाइल व उमेश यादवच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने सनरायझर्स संघाला १२८ धावातच रोखले.
हैदराबादचा डाव संपल्यानंतर लगेच पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे तीन तासांपेक्षा जास्त वेळ सामना थांबला होता. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर कोलकाताला ६ षटकात ४८ धावा काढण्याचे नवे लक्ष्य मिळाले. कर्णधार गौतम गंभीरने केलेल्या नाबाद ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर ५.२ षटकात ३ बाद ४८ धावा काढून विजय साकार केला. दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना मुंबई इंडियन्सशी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. आयपीएलच्या या मोसमात हैदराबादने १५ पैकी ८ सामन्यात विजय नोंदविला आहे. खुद्द कर्णधार वॉर्नर सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. (वृत्तसंस्था)