चॅम्पियन होण्याची भारताला संधी, पण क्षमता इंग्लंडमध्ये ः कपिल देव

0
125

मुंबई, १८ मे 
आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे, परंतु भारतीय संघापेक्षा इंग्लडचा संघ या स्पर्धेत अधिक चांगले प्रदर्शन करेल व इंग्लंडमध्ये विजेता होण्याची क्षमता आहे, असे मत १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्‍वकप मिळवून देणार्‍या माजी कर्णधार कपिलदेवने व्यक्त केले.
आगामी एक जूनपासून इंग्लंडमध्ये मिनी विश्‍वचषक अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार आहे. कपिलदेव म्हणाले की, भारतीय संघ जिंकावा असे मनापासून वाटते, पण क्रिकेटरच्या नजरेतून पाहिल्यास ते कठीण असल्याचे दिसते. कागदावर दिसणारा भारतीय संघ प्रभावी आहे. भारताला संधी आहे, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये बड्या नावांपेक्षा संघातील योगदानाला अधिक महत्व असते, इंग्लंडच्या संघामध्ये सध्या ती क्षमता आहे.
भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करतो आहे. २०११ चा विश्‍वचषक आणि २०१३ मधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली होती. यावेळी संघात विजय मिळवून देण्याची क्षमता असणारे खेळाडू होते, असेही ते म्हणाले.
४० वर्षानंतर पहिल्यांदाच मला इंग्लंडच्या संघाने प्रभावित केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आवश्यक असणारी क्षमता सध्या इंग्लिश खेळाडूंमध्ये दिसते. जॅसन रॉय, जोस बटलर, जो रूट, इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्स हे खेळाडू स्वत:च्या जोरावर सामना जिंकून देऊ शकतात. त्यामुळे इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर चॅम्पियन ठरू शकतो. यावेळी भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत खेळाडूंमध्ये सध्या संघात असणारा महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग यांच्यासह माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व सौरव यांच्यामध्ये एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता होती, असेही त्यांनी सांगितले.
एक जूनपासून इंग्लड आणि वेल्समध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ब गटात असून या गटात भारतासमोर पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांचे आव्हान असणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
कोहलीला सूर गवसेल
विराट कोहलीला आयपीएलमध्ये अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीत तो चमकदार प्रदर्शन करेल, असा विश्‍वास कपिलदेवने व्यक्त केला. विराटकडे असलेली क्षमता, नैपुण्य याची काळजी करू नये. आयपीएलमध्ये त्याला अपेक्षेनुरूप धावा करता आल्या नाहीत याचे कारण मला माहीत नाही. तथापि त्याच्या फॉर्मबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. तो भारतीय संघाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्याच्या खेळामुळे अन्य सहकार्‍यांना प्रेरणा मिळत असते. जेव्हा त्याला सूर सापडतो, तेव्हा त्याच्या संघमित्रांकडूनही चांगली कामगिरी होते. जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीचे कौतुक करीत कपिल म्हणाले, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबाबत मला सुरुवातीला फारशी चमक जाणवली नव्हती. मात्र त्याने केलेली प्रगती खूपच समाधानकारक आहे. चेंडू टाकण्याबाबतची त्याची शैली फारशी आकर्षक नसली तरी टप्पा व दिशा ओळखून गोलंदाजी करण्याबाबत त्याने प्रभाव दाखविला आहे. तो यॉर्करही चांगल्या पद्धतीने टाकत असतो. आपल्या संघात भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा असे अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे गोलंदाजीबाबत मला काळजी वाटत नाही.