‘केबीसी-९’च्या होस्टसाठी ग्लॅमरस अभिनेत्रीचा शोध

0
63

‘बिग बी’चा करार संपुष्टात
मुंबई, १८ मे 
आपल्या भारदस्त आवाजाने ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीचे ८ सीजन गाजवणारे बिग बी पुढील केबीसीमध्ये दिसणार नसल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली आहे. हा कार्यक्रम सुरू व्हायला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असून, अमिताभऐवजी एखाद्या ग्लॅमरस महिलेला संधी देण्याचा विचार केबीसीचे निर्माते करीत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा केबीसीसोबतचा करार संपला आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे आतापर्यंत ८ सीजन संपले आहेत. या आठही सीजनचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी केले. त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळाला. परंतु केबीसीचे निर्माते या शोचा पूर्ण फॉर्मेट बदलण्याचा विचार करीत आहेत. ८ सीजनमध्ये पुरुषांनी होस्ट केल्याने यावेळेस एखाद्या महिलेने कार्यक्रम होस्ट करावा यासाठी चॅनलने चाचपणी सुरू केली आहे. यासाठी केबीसीच्या निर्मात्यांकडून आतापर्यंत माधुरी दीक्षित आणि ऐश्‍वर्या राय-बच्चन यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा शो फॉर्मेट बदलल्यास आणि महिलेने या कार्यक्रमाचे होस्ट केल्यास हा कार्यक्रम एका नव्या उंचीवर जाईल, असा विश्‍वास केबीसीच्या निर्मात्याला वाटत आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही कार्यक्रमाचे होस्ट महिलेने केलेले नाही. (वृत्तसंस्था)