महाराष्ट्रातील पहिल्या आयकिया स्टोअर्सचे भूमिपूजन

0
58

नवी मुंबई, १८ मे
आयकिया इंडियाकडून नवी मुंबईतील तुर्भे येथे महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअर्सचे भूमिपूजन गुरुवारी १८ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. फर्निचरमधील जगातील सर्वात आघाडीचा ब्रँड म्हणून स्वीडनमधील ‘आयकिया’ची ओळख आहे. तुर्भेमधील नियोजित स्टोअर २०१९ मध्ये सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. या ठिकाणी किमान एक हजार कोटींची गुंतवणूक होणार असून ५०० ते ७०० प्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, असे कंपनीने म्हटले आहे.
परकी गुंतवणुकीची मर्यादा उठवल्यानंतर ‘आयकिया’ने २०१२मध्ये भारतात १० हजार ५०० कोटींची गुंतवणूक जाहीर केली होती.
आयकिया सध्या भारतातून गालीचे, हस्त कौशल्याच्या वस्तू आणि निवडक फर्निचर तयार करून घेते. हैदराबाद आणि नवी मुंबईतील स्टोअर्स सुरू केल्यानंतर भारतातील वस्तूंची श्रेणी वाढवली जाणार आहे. महिला बचत गटांच्या नावीन्यपूर्ण वस्तू खरेदी केल्या जाणार
आहेत. यामुळे राज्यातील हजारो बचत गटांना आयकियाच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जगभरातील स्टोअर्समध्ये भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. आयकियाचे भारतातील पहिल्या स्टोअरचे काम हैदराबादमध्ये वेगाने सुरू असून दिवाळीच्या आसपास ते पूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. भूमिपूजन सोहळ्याला आयकिया इंडियाचे मुख्य कार्यकारी जुवेन्शियो मेटझू उपस्थित होते.
२०२५ पर्यंत आयकीयांकडून भारतात ३० स्टोअर्स सुरू करण्यात येणार आहेत. आयकियाचे उत्पादने नावीन्यपूर्ण असून, कमी जागेत वापरण्याजोगी आहेत. त्यामुळे अफॉरडेबल हौसिंगमध्ये आयकियाला मोठ्या व्यावसायिक संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. (वृत्तसंस्था)