मल्ल्याचे अलिबागमधील फार्महाऊस ईडीकडून जप्त

0
86

मुंबई, १८ मे 
भारतातील विभिन्न बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून भारतातून इंग्लंडमध्ये पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जोरदार झटका दिला असून, त्याच्या मालकीचे १०० कोटी रुपये किंमतीचे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील फार्महाऊस ताब्यात घेण्यात आले आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
अलिबागमधील मांडवा येथे १७ एकर भूखंडावर हे फार्महाऊस उभारण्यात आले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यावर तात्पुरती जप्ती आणण्यात आली होती. विजय मल्ल्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या मांडवा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या कारवाईला अपिलीय लवादात आव्हान दिले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच हे आव्हान फेटाळण्यात आले आणि ईडीने आज या फार्महाऊसवर कारवाईचे पाऊल उचलले. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने हे फार्महाऊस आज ताब्यात घेतले.
या फार्महाऊसचे नोंदणीकृत मूल्य २५ कोटी असले तरी बाजारभावानुसार त्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.  (वृत्तसंस्था)