मा. गो. वैद्य यांना जीवन गौरव

0
142

मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर
मुंबई, १८ मे 
महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना म्हणून परिचित असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत आणि तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. तथा बाबुराव वैद्य यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जूनच्या तिसर्‍या आठवड्यात नागपूर येथे होणार्‍या एका समारंभात मा. गो. वैद्य यांना जीवन गौरव पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून दिली. गेल्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना देण्यात आला होता. परिषदेच्या अन्य ११ पुरस्कारांचीही आज घोषणा करण्यात आली.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना जाहीर करण्यात आला आहे, तर आचार्य अत्रे पुरस्काराने महाराष्ट्र टाईम्सचे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके यांना सन्मानित केले जाणार आहे. ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार यंदा लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांना जाहीर झाला आहे, तर पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा शोध पत्रकारिता पुरस्कार हितवादचे प्रतिनिधी कार्तिक लोखंडे यांना दिला जाणार आहे.
मा. गो. वैद्य यांचा अल्पपरिचय
माधव गोविंद तथा बाबुराव वैद्य यांचा जन्म ११ मार्च १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे झाला. संस्कृत विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी १९४६ मध्ये एम.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. नंतर त्यांनी माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाचे कार्य केले. १९६६ ते १९८३ अशी तब्बल १७ वर्षे ते नागपूर तरुण भारतचे संपादक होते. नंतर १९८३ ते १९९६ या काळात नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध संचालक आणि अध्यक्ष होते. हिंदुत्व आणि अन्य विषयांवरची त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्पष्टवक्ते आणि निर्भीड पत्रकार अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. रा. स्व. संघाचे अ. भा. बौद्धिक प्रमुख आणि अखिल भारतीय प्रचार प्रमुख या जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. त्यांचे स्पष्ट आणि सडेतोड अग्रलेख तसेच ‘मागोवा’ हे सदर त्या काळात वाचकांसाठी एक आनंद पर्वणी असायची. (वृत्तसंस्था)