रमण विज्ञान केंद्रात ‘संग्रह जोडतात संबंध’

0
81

नागपूर, १८ मे
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त शहरातील रमण विज्ञान केंद्र व छंदवैभवच्या संयुक्त विद्यमाने ‘संग्रह जोडतात संबंध’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. १३ वर्षांपासून या प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
या प्रदर्शनात नागपूरसह इतर शहरांमधील वेगवेगळ्या ३२ जणांनी संग्रहित केलेल्या विविध वस्तू, टपाल तिकिटे व शिक्के, त्रिमितीय वर्तमानपत्रे, त्रिमितीय कॅमेरा, त्रिमितीय छायाचित्रे, लाकडी तसेच बाटलीच्या आत ठेवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, प्राचीन काळातील दिवे, मेघदूत कार्ड, प्लॅस्टिक पेपर रेकॉर्ड, विविध प्रकारचे खोडरबर, भारतरत्न पुरस्कृतांच्या जन्म तारखांचे नंबर असलेल्या चलनी नोटा, नेक टाय, इंग्लडमधील स्पोटर्‌‌स क्लबची चिन्हे इत्यादींचे प्रदर्शन येथे करण्यात आले आहेत.
आपला छंद जोपासणार्‍या अनेक संग्रहकांचे संग्रह या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यातील अजाबराव खारोडे यांनी वेगवेगळ्या भिंगांच्या साहाय्याने संग्रहित केलेली त्रिमितीय वर्तमानपत्रे, त्रिमितीय कॅमेरा, त्रिमितीय छायाचित्रे आदींचे प्रदर्शन करण्यात आले आहे. नीलिमा हजारे मून यांनी साबणावर आवडत्या व्यक्तीचे चित्र व आकृतीसह स्वत: तयार केलेले व संग्रहित केलेल्या ५० पेक्षा जास्त कृतींचे संग्रह प्रदर्शित केले आहे. तसेच प्रदर्शनात प्रसिद्ध ऍाटोग्राफ संग्रहक लक्ष्मण लोखंडे यांनी १९७२ पासून घेतलेले ५०० पेक्षा अधिक ऑटोग्राफ प्रदर्शनात ठेवले आहे. त्यांनी घेतलेल्या ऑटोग्राफमध्ये प्रसिद्ध कुस्तीपटू व अभिनेता दारासिंग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचा समावेेश आहे.
चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. पण, ते खाल्ल्यानंतर त्याच्या रॅपरचे काय? अशाच रॅपरचा छंद जोपासणार्‍या १६ वर्षीय प्रथमेश रेईचच्या १५०० पेक्षा जास्त रॅपरचा संग्रहदेखील या प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. रोशनी व प्रज्योत पालिमकर या भाऊ व बहिणीच्या जोडीने कागदाच्या ऑलिग्रामी व कोरोग्रामी पद्धतीने तयार केलेले प्लॅस्टिक पेपर रेकॉर्ड येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच गंगाधर अडसड यांच्य नावे व पेपरकटिंगसह पटेल यांनी ४४ देशांच्या विमुद्रित करण्यात आलेल्या नोटांचा संग्रहदेखील या प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. त्यात तीन हजार ट्रिलियन रुपयांच्या झिम्बॉम्बे देशातील नोटांचा समावेश आहे. कलौजिया यांच्या इंग्लडमधील स्पोटर्‌‌स क्लब चिन्हाच्या संग्रहासह दिलीप डाहाके यांच्या फोटोग्राफ-ऑटोग्राफ संग्रहाचाही समावेश आहे. सुधाकर सोनार यांनी संग्रहित केलेली टपाल तिकिटे, शिक्के व टपाल पत्रांचा प्रदर्शनात समावेश आहेत. लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, युआरएफ, रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलेले गुजरातचे डॉ. दीपक शर्मा यांच्या नेक टाय संग्रहाचाही या प्रदर्शनात समावेश आहेत.