नागपुरातील सट्टेबाजांना नाशकात अटक

0
65

नागपूर, १८ मे
स्थानिक पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजांच्या मुसक्या आवळल्यानंतर या सट्टेबाजांनी इतर ठिकाणी आश्रय घेतला असून, अशाच एका गुन्ह्यात नागपुरातील सट्टेबाजांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
लोकेश ऊर्फ लकी मनोहरलाल खत्री (३३) रतन गोवर्धन अपार्टमेंट, चिटणीस पार्क मागे, शरद मोहन नाकोते (४६) गणेश अपार्टमेंट, जुनी शुक्रवारी, मोहम्मद शहबाज मोहम्मद इजाज शेख (२७) जोहरीपुरा, नवीन शुक्रवारी रोड, राजेश लक्ष्मण काळे (४५) गरोबा मैदान, साजिद वहिद बख्त (३०) काली मंदिराजवळ गोंदिया, अमित रमाकांत त्रिवेदी (३३) इलेक्ट्रॉनिक मार्केट सीताबर्डी, सूरज कलाया कमती (४०) आणि राजेश नथूनी कमती (२२) रा. दरभंगा (बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सध्या इंडियन प्रीमिअर लिगचे सामने सुरू असून, हे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी क्रिकेटवरील सट्ट्यावर कारवाई करण्याचे आदेश नाशिक पोलिसांना दिले होते. गुन्हे शाखा युनिट १ चे शिपाई स्वप्निल मुंढे यांना वडाळा शिवारातील विधातेनगर, ठक्करशी इस्टेट येथील एका बंगल्यात क्रिकेटवर सट्टा सुरू असून, लगवाडी आणि खायवाडी करणारे नागपूरचे लोक असल्याची माहिती खबर्‍याने दिली. माहिती मिळताच पोलिसांनी या अड्ड्यावर धाड घातली. यावेळी ७ जण टीव्हीसमोर बसून क्रिकेटवर सट्ट्याची लगवाडी करीत होते. पोलिसांनी या अड्ड्यांवरून ७९ मोबाईल, तीन लॅपटॉप, एक एलईडी टीव्ही, २ व्हाईस रेकॉर्डर व इतर साहित्य असा ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.