तीन दिवसांत ३६ कोटींची जमीन मूळ मालकाच्या ताब्यात

0
150

नागपूर, १८ मे
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ३६ कोटींची जमीन मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात शहर गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.
रोशन मिनहलदास जोधानी आणि ओमप्रकाश गोकुलदास बजाज यांनी इतर भागीदारांच्या मदतीने झुलेलाल डेव्हलपर्स या नावाने फर्म तयार केली होती. या भागीदारांनी कमलेश जैस्वाल आणि इतर ४ जणांकडून नारा येथील ४ एकर शेती खरेदी केली होती. या खरेदीची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे १४ फेब्रुवारी २००० मध्ये त्याची सात-बारावर नोंद घेण्यात आली. दरम्यान, एप्रिल २००० मध्ये जमिनीच्या मालकाचे नातेवाईक उषाबाई जैस्वाल व इतरांनी दिवाणी न्यायालयात दावा करून न्यायालयातून ‘स्टेट्‌स को’ मिळविला होता. ‘स्टेट्‌स को’ असतानाही ६ डिसेंबर २००५ रोजी ओमप्रकाश बजाज आणि आणि सुखदेव भागचंदानी यांनी इतर भागीदारांना काहीच सूचना न देता या जमिनीचे आममुखत्यारपत्र जयप्रकाश बजाज यांच्या नावे केले केले. त्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात केली. त्यानंतर जयप्रकाश बजाजने त्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून ही जमीन स्वत: हडपली.
या प्रकरणी रोशन जोधानी यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. पो. नि. शेख वजीर यांनी तब्बल २० दिवस या प्रकरणाचा तपास करून १६ मे रोजी ओमप्रकाश बजाज, सुखदेव भागचंदानी, जयप्रकाश बजाज, सुरेश बजाज, दुय्यम निबंधक अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे ओमप्रकाश आणि सुखदेव यांना अटक देखील केली होती.
गुन्हा दाखल होताच १६ मे रोजी जयप्रकाश आणि सुरेश यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन मेडिएशन सेंटर येथे खरेदीखत रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. एक पक्षकार बाहेरगावी असल्याने त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी पुढील सुनावणी २२ मे रोजी ठेवण्यात आली. औपचारिकता पूर्ण होऊन लवकरच ३६ कोटींची ही जमीन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मागील आठवड्यात देखील अशाच प्रकारे गोन्ही (खुर्द) येथील नारायण दुबे या ज्येष्ठ नागरिकाची १४ कोटींची जमीन त्यांच्या ताब्यात देण्यात आली.