कुलभूषणसाठी प्राणपणाने लढला नागपूरचा सुपुत्र

0
162

नागपूर, १८ मे
पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना भारताचा हेर असल्याचा ठपका ठेवून फाशीशी शिक्षा सुनावली. या प्रकारामुळे देशातील संपूर्ण जनमानसात सहानुभूतीची लहर पसरली आणि त्यांच्यावरील हे बालंट परतावून लावत त्यांचा बचाव करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पाकिस्तानी न्यायालयाच्या निर्णयाला भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले आणि त्याठिकाणी नागपूरचे सुपुत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी आपल्या विधि कौशल्याचा कस लावला आणि जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळविली. मुख्य म्हणजे पाकिस्तानी न्यायालयाचे पुरावे देखील निरस्त करण्यात ऍड. साळवे यांनी यश मिळविले. त्यामुळे नागपूरचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्राणपणाने लढला आणि तेही नि:शुल्क.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम असलेल्या हरीश साळवे यांनी देशहित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेचा विचार करता आणि भारतीयाचे जीवन वाचविण्यासाठी केवळ १ रुपया शुल्क घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस यश संपादन करणारे हरीश साळवे हे माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे नेते स्व. एनकेपी साळवे यांचे चिरंजीव आहेत. हरीश साळवे यांचे आजोबा वकील, पणजोबा न्यायाधीश होते. त्यांच्या भगिनी अरुणा व जावई अरुण उपाध्याय हे देखील मूळचे नागपूरकर आणि आता लंडनमध्ये स्थायिक आहेत. ऍड. साळवे यांचे यश देशवासीयांसाठीच नव्हे तर नागपूरकरांसाठी देखील तेवढेच अभिमानास्पद आहे. या खटल्यात भारताचा विजय होईल. कुलभूषण जाधव मायदेशी परत येतील याची खात्री आहे.