विकास ठाकरेंविरुद्ध जिचकारांनी थोपटले दंड

0
134

– मनपाच्या स्वीकृत सदस्यांसाठी सहा नामनिर्देशन
– भाजपाकडून अग्रवाल, पोकुलवार, गांधी, वानखेडे यांचे अर्ज सादर
नागपूर, १८ मे
कोणे एकेकाळी सतीश चतुर्वेदींचे आणि नंतर विलास मुत्तेमवारांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक तानाजी वनवे यांचा मनपा सभागृहातील कॉंग्रेसच्या गटनेते पदाचा दावा अजूनही कायम असताना आज शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्वीकृत सदस्यत्वासाठी आपला अर्ज सादर केला. दरम्यान, शहर कॉंग्रेस अध्यक्षांविरुद्ध दंड थोपटून त्यांचे एकेकाळचे सहकारी किशोर जिचकार यांनी आज त्यांच्या विरोधात स्वीकृत सदस्य म्हणून कॉंग्रेसकडून अर्ज दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, आमच्या पाठीशी १६ नगरसेवक असल्याचा तानाजी वनवे यांचा दावा आजही कायम होता.
स्वीकृत सदस्यांसाठी नामांकन अर्ज सादर करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंतची वेळ ठरविण्यात आली होती. विकास ठाकरे यांनी सकाळच्या सुमारास आपला अर्ज दाखल केला. त्यांच्या नावाची शिफारस कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते संजय महाकाळकर यांनी केली आहे. दरम्यान, दुपारच्या सत्रात किशोर जिचकार यांनी अर्ज दाखल करून या निवडणुकीत रंग भरला आहे.
मनपाच्या स्वीकृत सदस्यपदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आज सहा नामांकन अर्ज दाखल झालेत. त्यामध्ये भाजपाच्या चार आणि कॉंग्रेसच्या दोन अर्जांचा समावेश आहे. एकूण पाच जागा असून त्यापैकी चार जागा भाजपाच्या वाट्याला आल्या असून एक जागा कॉंग्रेसकडे गेली आहे. भाजपातर्फे मनपाचे ज्येष्ठ सदस्य सुनील अग्रवाल, मुन्ना पोकुलवार, निशांत गांधी व किशोर वानखेडे यांची नावे पक्षातर्फे जाहीर करण्यात आली असल्यामुळे त्यांची निवड निश्‍चित समजली जात आहे. गुरुवार १८ मे रोजी भाजपाच्या चारही उमेदवारांनी मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, निगम सचिव हरीश दुबे उपस्थित होते. भाजपाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना आ. सुधाकर देशमुख, आ. परिणय फुके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंग्रेस पक्षातर्फे माजी महापौर व माजी विरोधी पक्षनेता विकास ठाकरे यांनी अर्ज दाखल केला तर कॉंग्रेसमधीलच तानाजी वनवे गटातर्फे किशोर जिचकार यांचा अर्ज मनपा आयुक्नांना प्राप्त झाला. विकास ठाकरे यांनी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, अभिजित वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, प्राप्त अर्जांची उद्या छाननी होणार असून वैध अर्ज सादर करणार्‍यांची नावे उद्याच १९ मे रोजी जाहीर केली जाणार आहेत. आयुक्त उद्या प्राप्त अर्जाची छाननी करतील आणि वैध असणार्‍या अर्ज ग्राह्य धरतील. कोणाची निवड करायची हा अधिकार आता आयुक्तांकडे असून वैध ठरणार्‍या उमेदवारांची नावे मनपाच्या येत्या सर्वसाधारण सभेत जाहीर केली जातील, अशी माहिती निगम सचिव हरीश दुबे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, विकास ठाकरे यांनी नामांकन सादर करताना गटनेत्याचे पत्र सोबत जोडले असून किशोर जिचकार यांनी फक्त नामांकन अर्ज सादर केला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश प्राप्त झाले नाही तर विकास ठाकरे यांची निवड निश्‍चित समजली जात आहे.
दरम्यान, तानाजी वनवे गटाने काल विभागीय आयुक्तांकडे आपला दावा सादर करताना १७ नावांचे आणि १६ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र सादर केले होते. यात रमेश पुणेकरांचे नाव होते. मात्र त्यांनी स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे या संदर्भात पुणेकर यांचे मत जाणून घ्यावे, असे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे मनपा आयुक्तांना कळविण्यात आल्याचे कळते.