मुलीच्या लग्नात गायवासराचे ‘आंदण’

0
106

चेतनादूताने दिला गोसेवेचा संदेश
उज्ज्वल सोनटक्के
यवतमाळ, १९ मे
जिल्ह्यातीलच कित्येक शेतकर्‍यांसमोर गोधनाअभावी शेतीचे मोठमोठे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यावर उपाय म्हणजे गोधनाचे संगोपन करून त्याचे संवर्धन करणे होय. गायीचे महत्त्व लक्षात घेत बळीराजा चेतना अभियानाच्या एका चेतनादूताने मुलीच्या लग्नात गायवासराचे आंदण देऊन शेतकर्‍यांना गोसेवेचा संदेश दिला.
मूळचे मानोरा तालुक्यातील जवळा येथील रहिवासी असलेले व सध्या दिग्रस येथे स्थायिक झालेले रामराव राऊत यांच्या मुलीचे शुक्रवार, १९ मे रोजी पुसद येथील विक्रांत धर्माळे यांच्याशी लग्न झाले. बळीराजा चेतना अभियानाचे दूत असलेल्या राऊत यांनी हा लग्नसोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असाच साजरा केला. त्यांनी लग्नात मुलीला आंदण म्हणून गायवासरू देत समाजासमोर गोसेवेचा आदर्श ठेवला.
सोबतच लग्नाला येणार्‍या शेतकर्‍यांचे मनोबल वाढावे, सेंद्रिय शेतीसोबत गोसंवर्धनाचे महत्त्व कळावे म्हणून संपूर्ण मंडपात विविध शेतकरी मार्गदर्शनाचे फलकही त्यांनी लावून घेतले होते. रामराव राऊत यांनी राबविलेल्या उपक्रमाचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकर्‍यांना नैराश्यातून बाहेर काढणे, तसेच त्यांना पुन:श्‍च गोसंवर्धनाकडे वळवणे हा आहे.
कमी होत चाललेल्या गोधनामुळे शेतात टाकण्यासाठी शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. अशातच रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचा पोतही खराब होत आहे. त्यामुळे शेतीत पाहिजे तसे उत्पादन शेतकर्‍यांना घेता येत नाही. परिणामी कमी उत्पादनामुळे शेतकर्‍यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेणखताचा, सेंद्रिय खताचा उपयोग करून जमिनीचा पोत सुधारणे महत्त्वाचे झाले आहे.
गोधनाचे योग्य पद्धतीने संगोपन केल्यास शेणखताचा प्रश्‍न तर सुटेलच, पण महत्त्वाचे म्हणजे गोपालनामुळे शेतीपूरक व्यवसाय निर्माण होऊन आर्थिक विवंचनाही काही प्रमाणात संपुष्टात येण्यास मदत होईल, असे राऊत यांचे मत आहे. गोसंवर्धनामुळे शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. तसेच नैराश्यातून बाहेर पडण्यासही मदत होईल, असे त्यांचे मत आहे.
चेतनादूत रामराव राऊत यांनी मुलीच्या लग्नात गायवासरू आंदणात देऊन राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.