जीएसटीची सेवा कररचना तयार

0
82

पुढील बैठक ३ जूनला
श्रीनगर, १९ मे
येत्या १ जुलैपासून देशभरात लागू होत असलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी व्यवस्थेत सेवांवरील करांची रचना आज शुक्रवारी श्रीनगर येथे जीएसटी परिषदेच्या बैठकीत तयार करण्यात आली. शिक्षण आणि आरोग्यसेवेला जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आले असल्याने या दोन्ही सेवा परवडणार्‍या होणार आहेत.
सेवांवरील करांकरिता चार टप्पे निश्‍चित करण्यात आले आहेत. ५, १२, १८ आणि २८ टक्के असे करांचे टप्पे राहणार आहेत. वस्तूंवर आकारण्यात येणार्‍या करांची रचनाही अशीच राहणार आहे, अशी माहिती केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी पत्रकारांना दिली.
तथापि, सोन्यावरील कराचा दर किती असावा, याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. परिषदेची पुढील बैठक ३ जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, ३५० सीसी क्षमतेच्या मोटारसायकल, सर्व प्रकारच्या कार, बसेस, ट्रक्स लहान आकाराचे जहाज आणि खाजगी जेट विमानांवर ३ ते ३१ टक्केपर्यंत अधिभार लागणार आहे. ३५० सीसीच्या बाईकवर तीन टक्के अधिभाराची तरतूद राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे चार मीटर लांबीच्या आणि पेट्रोलचे इंजिन असलेल्या १२०० सीसी क्षमतेच्या लहान कारवर १ टक्का कर लागणार आहे. तर, अशाच स्वरूपातील १५०० सीसी क्षमतेच्या लहान डिझेल कारवर तीन टक्के अधिभार लागणार आहे. मध्यम आकाराच्या आणि लक्झरी कारवर १५ टक्के आणि बस व १० पेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करणार्‍या एसयूव्हीवर १० कराची तरतूद यात आहे. पान मसाला, गुटख्यावर सुमारे ७१ ते २०४ टक्के अधिभार आकारण्यात येणार आहे. सुगंधित जर्दा आणि फिल्टर खैनीवर १६० टक्के कर लागणार आहे. (वृत्तसंस्था)
अशी आहे कररचना
५% : वाहतूक सेवा, ५० लाखापर्यंत उलाढाल असलेले रेस्टॉरंट, ओला, उबेरसारख्या सेवा, साखर, चहा, कॉफी, खाद्यतेल.
१२% : वातानुकूलित नसलेले रेस्टॉरंट, अन्य हॉटेल्स,
१८% : वातानुकूलित रेस्टॉरंट आणि परवानाप्राप्त दारूची दुकाने, दूरसंचार, आर्थिक सेवा
२८% : पंचतारांकित हॉटेल्स, रेस क्लब, बेटिंग, सिमेमा हॉल्स,