केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आणली बंदी
पाटणा, १९ मे
पाटणानजीक दानापूर परिसरात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांची मालकी असलेल्या मॉलच्या इमारतीच्या बांधकामावर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने एका आदेशान्वये बंदी आणली आहे.
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता सुशीलकुमार मोदी यांनी आज पत्रकारांना सांगितले की, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लालू प्रसाद यांच्या परिवाराच्यावतीने बेली मार्गावर मॉलचे बांधकाम करण्यात येत होते. या मॉलची मालकी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि माजी मुख्यमंत्री राबड़ी देवी यांच्याकडे आहे.
त्यांच्या डिलाइट मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाच्या नावे ११५ एकर जमिनीवर ७ लाख ६६ हजार वर्गफुट क्षेत्रात ७५० कोटींच्या नियोजित खर्चातून बहुमजली मॉल तयार करण्यात येत होता. राजदचे आमदार अबू दोजाना यांच्या कंपनीद्वारे मॉलचे बांधकाम करण्यात येत होते. मात्र, मॉल बनत असलेल्या जागेतून विनापरवानगी मातीचे खोदकाम करणे आणि विनापरवानगी बांधकाम सुरू केल्याने ही बंदी आणली आहे.
दरम्यान, भाजपा नेते सुशील मोदी यांनी आरोपात म्हटले की, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे उल्लंघन करून हे बांधकाम करण्यात येत होते. तसेच, कामासाठी राज्य पर्यावरण प्राधिकरणाकडूनही परवानगी घेण्यात आलेली नाही. ही बाब प्रसारमाध्यमांनी लक्षात आणून दिल्यानंतर १ एप्रिल रोजी मंजुरीसाठी अर्ज करण्यात आला.
भाजपाला खुर्चीतून खाली फेकेन : लालू
मी आपल्या आयुष्यात एका पैशाचाही घोटाळा केलेला नाही. पण, भाजपा आणि रा. स्व. संघाचे नेते माझी व कुटुंबीय सदस्यांची बदनामी करण्यासाठी माझ्यावर असे खोटे आरोप लावत आहेत. भाजपाला केंद्रातील सत्तेतून बाहेर फेकण्याची क्षमता माझ्यात आहे, असा थयथयाट राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज शुक्रवारी केला.
भाजपा आणि संघाच्या नेत्यांना मी घाबरत नाही. तुम्हाला दिल्लीतील खुर्चीवरून खाली खेचण्याची क्षमता माझ्यात आहे. मग, यासाठी माझी स्थिती काहीही झाली तरी पर्वा नाही. मी तुम्हाला घाबरत नाही, कारण, माझ्याकडे जो काही पैसा आहे, त्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवलेला आहे आणि त्यावर मी प्रामाणिकपणे करही भरत असतो, असे लालूंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजपा आणि संघ माझ्यावर राजकीय सूड उगवत आहेत. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. ते माझ्यासोबतच माझ्या पक्षाचीही प्रतिमा खराब करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुडाचेच धोरण कायम ठेवले तर हे सरकार टिकणार नाही. येत्या ऑगस्ट महिन्यात मी पाटणा येथील गांधी मैदानावर विशाल मोर्चाचे आयोजन केले असून, यात समान विचारणसरणीचे नेते उपस्थित राहतील. यात भाजपाविरोधात पुढील रणनीती निश्‍चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)