जो खेले वही खिले

0
152

पंतप्रधानांनी दिला प्रेरणादायी संदेश
नवी दिल्ली, १९ मे
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी सचिन अ बिलियन ड्रीम्स या सिनेमाच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाली.
सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित सचिन अ बिलियन ड्रीम्स येत्या २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. सचिन अ बिलियन ड्रीम्सबद्दल पंतप्रधानांना सांगितले व मोदींनी शुभेच्छा दिल्या, असे ट्वीट मास्टरब्लास्टरने केले आहे.
जो खेले वही खिले, हा प्रेरणादायी संदेश पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचेही सचिनने सांगितले. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला. त्याचा जीवन प्रवास आणि कामगिरी १२५ कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही आहे.
सचिनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन जेम्स एर्स्किन यांनी केले आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत. या चित्रपटाला ए. आर. रेहमानने संगीत दिले आहे. (वृत्तसंस्था)