पाकला गुलाम करण्याचे चीनचे धोरण

0
92

राजकीय अभ्यासकांचे मत
नवी दिल्ली, १९ मे
चीन-पाक आर्थिक कॉरिडोरमुळे आपली गरिबी दूर होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना वाटत असले, तरी अब्जावधी डॉलर्सच्या या प्रकल्पामुळे पाकिस्तानमधील सर्व कृषी जमीन चीनच्या ताब्यात जाणार असून, पाकमधील प्रत्येक मार्गावर चीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याने या देशातील सर्व घडामोडींवर चीनची बारीक नजर राहणार आहे. एकप्रकारे पाकला गुलाम करण्याचेच चीनचे धोरण असल्याचे मत राजकीय अभ्यासकांनी वर्तविले आहे.
गुलाम काश्मिरातून जाणार्‍या या आर्थिक कॉरिडोरवर पाक आणि चीन यांच्यात १५ वर्षासाठी करार झाला आहे. त्यामुळे पाकमधील सध्याची स्थिती आणि सामाजिक रचनेत प्रचंड मोठा बदल होणार आहे. परिणामी पाकवर चिनी संस्कृतीही थोपविली जाणार आहे, असे अभ्यासकांना वाटते. या प्रकल्पानुसार चीन पाकिस्तानमध्ये ६२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्याबदल्यात पाकमधील हजारो एकर कृषी जमीन चिनी कंपन्यांना भाडेतत्त्वावर मिळणार आहे. या कंपन्या बियाणांच्या जातींच्या संशोधनापासून ते सिंचनापर्यंतच्या सर्व योजनांसाठीचा प्रकल्प राबविणार आहेत. याशिवाय, पेशावरपासून कराचीपर्यंत सर्व शहरांवर चीनची सीसीटीव्ही कॅमेरांमधून नजर राहणार आहे. रस्त्यांपासून बाजारापर्यंतची कायदा व सुव्यवस्था चीनच्या नजरेत राहणार आहे. शिवाय पाकिस्तानात नॅशनल फायबर ऑप्टिक सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा वापर केवळ इंटरनेटसाठीच नाही; तर चॅनेल ब्रॉडकास्टिंगसाठीही होणार आहे.
या चॅनेलवरून चिनी संस्कृतीचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. पाकच्या बाजारपेठांमध्येही चिनी कंपन्यांचा शिरकाव होणार असल्याने पाकच्या अर्थव्यवस्थेवर चीनचे पूर्ण नियंत्रण येणार आहे. त्यामुळे पाकला प्रत्येक गोष्टींसाठी चीनवर अवलंबून राहावे लागणार असल्याने पाकिस्तानला हळूहळू गुलाम बनविण्याकडे चीनची वाटचाल सुरू झाली आहे. त्यातून भविष्यात भारतालाही धोका निर्माण होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. (वृत्तसंस्था)