राजकारणात गेल्यास चुकीच्या लोकांना दूर ठेवेन : रजनीकांत

0
105

चेन्नई, १९ मे
मी राजकारणात प्रवेश केल्यास चुकीच्या लोकांना माझ्यापासून दूर ठेवेन. व्यवस्था भ्रष्ट झाली असून, आपण सगळ्यांनी मिळून ती बदलायला हवी. ज्या लोकांनी मला यशाच्या शिखरापर्यत पोहोचवले मला त्यांची सेवा करायची आहे, असे सांगत तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आज राजकारण प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहे.
रजनीकांत मागील चार दिवसांपासून दौर्‍यावर असून ते नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत आहेत, त्यांच्यासोबत छायाचित्र काढत आहेत.
लवकरच चांगले घडणार असून, धीर धरत आपल्या कामावर लक्ष द्या,असे आवाहन चाहत्यांना केले आहे. मला तामिळी लोकांनी मोठे केले असून कधी तुम्ही मला तामिळनाडूच्या बाहेर काढले तर मी अन्यत्र कुठे न जाता थेट हिमालयात जाईन, असा भावनिक उद्गारही रजनीकांत यांनी काढले.
द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे कुशल प्रशासक असून, त्यांना कामाबाबत स्वातंत्र्य दिल्यास ते चांगले काम करतील, असे सांगत त्यांनी अंबुमणी रामदास, तिरुमावलवन आणि अभिनेता-दिग्दर्शक सेमन यांचे कौतुक केले. दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रजनीकांत राजकारणात प्रवेश करतील, असा अंदाज तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)