अनिल दवे अनंतात विलीन

0
106

नर्मदेच्या तीरावर अंत्यसंस्कार
भोपाळ, १९ मे
केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या तीरावर संपूर्ण शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आला.
मूळ मध्यप्रदेशचेच असलेले अनिल दवे यांचे गुरुवार राजधानी दिल्लीत वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले होते. नर्मदेच्या तीरावरच आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशी इच्छा त्यांनी आधीच बोलून दाखवली होती. त्यानुसार त्यांच्या पार्थिवावर होशंगाबाद जिल्ह्यातील नर्मदेच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
अनिल दवे यांचे पार्थिक आज सकाळीच दिल्लीहून येथे आणण्यात आले होते. दवे यांचे बंधू आणि भाच्याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, उमा भारती, अनंत कुमार, नरेंद्रसिंग तोमर आणि थावरचंद गेहलोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, सह सरकार्यवाह दत्तात्रय होशबळे आणि सुरेश सोनी, भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्यासह शेकडोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते. यावेळी त्यांना मानवंदनाही देण्यात आली.
मध्यप्रदेश सरकारने गुरुवारीच राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. (वृत्तसंस्था)